कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी एकत्र आले मात्र वाद वाढवून ठेवला ! वडगाव निंबाळकर पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला
आय मिरर
बारामती तालुक्यातील करंजे पूल बस स्टॅन्ड परिसरात कौटुंबिक वादातून दोन गटात मारामारी झाली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात 13 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले तर वडगाव निंबाळकर पोलिसांनी आठ जणांना अटक देखील केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
यातील ऋषिकेश सुरेश शिंदे हा गंभीर जखमी असून सान्वी हॉस्पिटल करंजे पुल या ठिकाणी उपचार घेत आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींपैकी आठ आरोपींना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.
दोन कुटुंबात असणारा वाद मिटवण्यासाठी बारामती तालुक्यातील करंजे पूल बस स्थानक परिसरात सर्वजण एकत्र आले होते आणि त्याच ठिकाणी दोन्ही बाजूकडून आपापसात काचेची बॉटल लाकडी दांडके आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात ऋषिकेश सुरेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून सखाराम अहिरे,गणेश अहिरे,महेश अहिरे, स्नेहल सुरेश जगताप,सागर बाळू साळुंखे,संकेत सतीश सोनटक्के,साहिल भरत सावंत व संदीप लक्ष्मण लगस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर स्नेहल सुरेश जगताप यांच्या फिर्यादीवरून संकेत सुरेश शिंदे,ऋषिकेश सुरेश शिंदे,निकिता गणेश अहिरे,रत्ना सुरेश शिंदे व अश्विनी संकेत शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.
कोणीही बेकायदेशीर जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची प्रयत्न केल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. - नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी
What's Your Reaction?