बिग ब्रेकिंग | मामी भाच्याच्या लग्नाला निघाल्या होत्या, पण मध्येच काळाने घाला घातला अन्...
आय मिरर
राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर एका कारला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण किरकोळ जखमी झाले.
लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे (वय ४७, रा. बारागाव नांदूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजेदरम्यान घडला.
मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब सोन्याबापू साळवे (रा. बारागाव नांदूर) हे आज कार घेऊन निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे भाच्याच्या लग्नाला निघाले होते. कारमध्ये साळवे यांची पत्नी व तीन बहिणी, असे पाच जण होते. राहुरी महाविद्यालयाजवळ सकाळी ११ वाजता साई दर्शन हॉटेल समोर अज्ञात चारचाकी वाहनाने कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात कारमधील लक्ष्मीबाई साळवे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. कारमधील बाळासाहेब साळवे व त्यांच्या तीन बहिणी (नावे समजली नाहीत) किरकोळ जखमी झाले. जखमींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी लक्ष्मीबाई यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले. जखमींवर औषधोपचार करण्यात आले. अपघातानंतर यावेळी रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.
दरम्यान, राहुरी ते राहुरी फॅक्टरी महामार्गाचे डांबरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून ठेकेदाराने सर्व यंत्रणा शिर्डीकडे हलविली आहे. त्यात, अवजड वाहने पूर्ववत सुरू झाली आहेत. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे.
What's Your Reaction?