जिल्ह्यात सर्वाधिक दर देणारा ठरला इंदापूरचा 'कर्मयोगी' चालू गाळपासाठी 3350 रुपये जाहीर
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या ऊस गाळप हंगामात जिल्ह्यातील उच्चांकी दर जाहीर केला आहे. ज्यावेळी कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला होता त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगर लिमिटेडचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दर कर्मयोगी कारखाना देईल अखेर या आश्वासनाची पूर्ती आज करण्यात आली आहे.
2025 26 च्या ऊस गाळपासाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि.ओंकार शुगर अँड डिस्टिलरी युनिट नंबर 11 ने शेतकऱ्यांना प्रति टनासाठी 3350 रुपये ऊस दर जाहीर केला आहे. यातील पहिला हप्ता 3200 तर उर्वरित 150 रुपये दीपावलीला दिला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उच्चांकी दर कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याने जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आतापर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कारखान्याचे चेअरमन असलेल्या माळेगाव साखर कारखान्याने या हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल 3300 रुपये जाहीर केली असून कर्मयोगीने एक पाऊल पुढे टाकत 3350 रुपये दर जाहीर केला आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने देखील या वर्षीच्या गळीत हंगामा करिता 3300 रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला आहे. तर इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने देखील आपल्या दराची घोषणा केली असून यावर्षी श्री छत्रपती साखर कारखान्याकडून प्रति टनासाठी 3100 रुपये ऊस दर जाहीर केला आहे. तर इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने देखील 3100 रुपये पहिली उचल जाहीर केली आहे.
पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवले जातात. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव कारखान्याचे चेअरमन आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंत राखली आहे. यावर्षीची पहिली उचल माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 3300 रुपये जाहीर केली असून कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने मात्र एक पाऊल पुढे टाकत 3350 रुपये प्रति टन म्हणजेच माळेगाव पेक्षा 50 रुपये ज्यादा दर घोषित केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
राजकीय भांडवल म्हणून कर्मयोगी कडे नेहमीच बोट...
इंदापूर तालुक्याचे शिल्पकार खासदार स्वर्गीय शंकररावजी बाजीराव पाटील यांनी बिजवडीच्या माळरानावर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे रोपटे उभा केले. आज या कारखान्याला 25 वर्षाहून अधिक काळ लोटला गेला. या कालखंडात राज्यकर्त्यांकडून नेहमीच या कारखान्याची कोंडी केली गेली. मागील दहा वर्षापासून कर्मयोगी कारखाना अडचणींचा सामना करतोय. शेवटी कारखाना पूर्वपदावर आणायचा असेल तर सहकाराला खाजगी व्यावसायिकाची जोड द्यायची आणि स्पर्धेच्या युगात दोन पावलं पुढे टाकायची हे धोरण स्वीकारून कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी हा कारखाना ओंकार शुगर या ग्रुप कडे करार पद्धतीने चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या निर्णयावरून वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चाही झाल्या, अनेक राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावरून हर्षवर्धन पाटील यांना लक्ष केलं. मात्र याच कर्मयोगी कारखान्याने आज जे नेते हर्षवर्धन पाटील यांना कर्मयोगी वरून लक्ष करत होते, त्यांच्या ताब्यातील असणाऱ्या कारखान्यांपेक्षा अधिकचा दर देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
What's Your Reaction?