बाप रे...११७ जणांना तीन कोटी 73 लाखांना गंडवलं ! बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा

Aug 4, 2026 - 07:11
Aug 4, 2026 - 07:15
 0  547
बाप रे...११७ जणांना तीन कोटी 73 लाखांना गंडवलं ! बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा

आय मिरर 

विविध शासकीय विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ११७ उमेदवारांकडून तब्बल ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीच्या रणजित हरीभाऊ मोढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुबायू सरकार उर्फ राणा रा. वर्धमान, कोलकाता, पश्चिम बंगाल आणि प्रमोद भगवान गुरव रा. ज्योतिर्लिंग हौसिंग सोसायटी, सेक्टर क्र. ६, घणसोली, नवी मुंबई, मूळ रा. उंड, ता. कराड, जि. सातारा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची २०२० पासून प्रमोद गुरव याच्याशी ओळख होती. गुरव याने त्यांची सुबायू सरकार उर्फ राणा याच्याशी भेट घडवून आणली. राणा हा आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, ओएनजीसी, रेल्वे तसेच इतर शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळवून देत असल्याचा दावा दोघांनी केला होता. यापूर्वी अनेकांना सरकारी सेवेत रुजू केल्याचेही त्यांनी सांगितल्याने फिर्यादीसह अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

सन २०२३-२४ मधील विविध भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील नोकरीसाठी प्रत्येकी सुमारे पाच लाख रुपये, तर रेल्वेतील नोकरीसाठी सहा लाख रुपये खर्च येईल, असे सांगून उमेदवारांकडून मोठी रक्कम उकळण्यात आली.

फिर्यादीसह एकूण ११७ जणांकडून रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने एकूण ३ कोटी ७३ लाख रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर उमेदवारांना विविध शासकीय विभागांच्या बनावट निवड याद्या, खोटे शिक्के असलेली नियुक्तीपत्रे देण्यात आली. काहींना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचेही नाटक करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही सरकारी नोकरी मिळाली नसल्याचे समोर आले असून, उमेदवारांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलिस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow