भिगवण प्रकरणाला नवे वळण ; तरुणीचा न्यायाधीशांसमोर यू टर्न
आय मिरर (निलेश मोरे)
भिगवण बाजारपेठेतून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याच्या कथित घटनेने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. आज बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तरुणीची इच्छा विचारली. त्यावेळी तिने आई आणि मामाकडे जाण्याची तयारी दर्शवली. या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
लग्न अवघ्या दोन दिवसांवर असताना आई व भावासोबत खरेदी करून घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आई आणि भावाकडून करण्यात आला होता. यावेळी आई आणि भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखत आंदोलन केले. भिगवण बंदची हाक देण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चाची तयारी सुरू होती.
मात्र, प्रकरणात त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात तिने “माझे अपहरण झालेले नाही. मी संबंधित तरुणासोबत माझ्या मर्जीने आले असून आमचे प्रेमसंबंध आहेत,” असा दावा केला होता. त्यानंतर दोघेही पोलिसांसमोर हजर झाले.
दरम्यान, तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी तिला बारामती न्यायालयात हजर करण्यात आले असता तिची आईही न्यायालय परिसरात उपस्थित होती. “माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या,” अशी आर्त विनंती आईने केली. मात्र त्या वेळी तरुणीने आईसोबत जाण्यास नकार दिल्याने तिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.
सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तरुणीची इच्छा विचारली. त्यावेळी तिने आई आणि मामाकडे जाण्याची तयारी दर्शवली. या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, सुरुवातीला अपहरणाचा आरोप आणि नंतर प्रेमसंबंधाचा दावा यामुळे परिसरात विविध चर्चा रंगल्या आहेत. न्यायालयाच्या पुढील आदेशाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?