बिग ब्रिकींग | इंदापूरच्या डाळज दोन येथे भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Feb 26, 2026 - 20:28
Feb 26, 2026 - 20:36
 0  6512
बिग ब्रिकींग | इंदापूरच्या डाळज दोन येथे भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2 येथे सोलापूर–पुणे महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आदिती अमर हातेकर (वय 25 वर्षे), सखुबाई ईश्वर गेजगे (वय 60 वर्षे) व जय अमर हातेकर (वय 2 वर्षे), सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर यांचा समावेश आहे. 

अपघातात इको गाडीचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय 50 वर्षे, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच स्वाती कबीरदास गेजगे (वय 34 वर्षे) व समृद्धी कबीरदास गेजगे (वय 10 महिने), दोघीही रा. पाटस या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर–पुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो (एम एच 13 सीयु 5163) याचा टायर अचानक पंचर झाल्याने वाहन चालकाने तो टेम्पो महामार्गाच्या साईडला अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभा केला होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको (एम एच 12 एक्स ई 8816) या चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow