पालखी सोहळ्यासाठी इंदापूरचे प्रशासन सज्ज : क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

आय मिरर
इंदापूर तालुक्यात येणाऱ्या पाच पालखी सोहळ्यांसाठी लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, सुरक्षा यासह सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
त्यासाठी तालुक्यातील सरपंच, तलाठी, पोलीस, पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद आदी विभागांनी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शनिवारी 7 जून रोजी इंदापूरात राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पालखी तयारी आढावा बैठक संपन्न झाली यावेळी भरणे बोलत होते.
क्रीडामंत्री भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासह संत सोपान काका, संत निळोबाराय,संत चांगावटेश्वर व संत चौरंगीनाथ यांच्या पालख्या मुक्कामी विसावत असतात.यावेळी वैष्णवांची सेवा करणे हे पुण्याचे काम असून वैष्णवांची चांगली सेवा करून तालुक्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले.
आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह, संत सोपान काका पालखी सोहळा, संत निळोबाराय पालखी सोहळा, संत चांगावटेश्वर पालखी सोहळा व संत चौरंगीनाथ पालखी सोहळा इंदापूर तालुक्याच्या विविध मार्गांवरील गावांमध्ये मुक्कामी विसावणार आहेत.याबाबतच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय जगताप, पंचायत समिती बांधकाम विभाग उपाभियंता शिवाजी राऊत, पाणीपुरवठा उपअभियंता प्रशांत गावंडे, लघु पाटबंधारे विभाग उपअभियंता शुभम चरवंडे, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी संतोष बाबर, प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.पी एम तरंगे, वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे यांच्यासह महसूल प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, विविध गावचे आजी माजी सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






