हिंदू–मुस्लिम भाई भाई… विधान भवनात ठणकावून सांगणारा हा तुमचा आमदार एकमेव : दत्ता भरणे
आय मिरर
“हिंदू मुस्लिम आम्ही भाई भाई आहोत… आणि हे मी विधानभवनात ठणकावून सांगणार,” असे स्पष्ट आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमधील प्रचार सभेत मुस्लिम मतदारांना दिले. शांतता, सद्भावना आणि विकासाच्या राजकारणावर आपला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अकलूज नाका येथे झालेल्या या सभेत भरणे यांनी इंदापूरच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. “पूर्वीचा इंदापूर आणि आजचा इंदापूर यात जमीनअस्मानाचा बदल आहे. रस्ते, बाजारपेठ, सुविधा… प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे,” असे त्यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष अंकिता शहा आणि स्वतःने मिळून विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत भरणे म्हणाले, “मी आमदार झालो तेव्हापासून कधीही गट–तट, जात–धर्म पाहिला नाही. मदत हवी तिथे निःपक्षपातीपणे केली.”
शिरसोडी पूलाची ‘एका रात्रीत’ मंजुरी...
शिरसोडी पूल कसा मंजूर केला याची आठवण सांगताना ते म्हणाले, “रातोरात मुंबईत पोहोचून, सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून घेत पूल मंजूर करून घेतला. हे खोटं असेल तर परमेश्वर मला शिक्षा देवो.”या पुलामुळे शहरातील बाजारपेठ पाचपटीने वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
867 कोटींच्या निधीचा उल्लेख...
मागील पाच वर्षांत इंदापूरसाठी तब्बल 867 कोटींचा निधी आणल्याचे भरणे यांनी सांगितले. “इंदापूर बदलत नसेल, तर चष्मा बदला,” असा टोमणा त्यांनी विरोधकांना मारला.
भाईचारा आणि शांततेचा संदेश
धर्माध राजकारणावर टीका करत त्यांनी स्पष्ट केले,की “हिंदू-मुस्लिम भांडण लावून स्वतःच्या पोळ्या भाजून घेणे हा आमचा स्वभाव नाही. आम्ही भाई भाई आहोत — हे विधानभवनातही ठणकावून सांगणारा हा तुमचा इंदापूरचा आमदार आहे.”
भरत शहा यांना आशीर्वाद द्या...
भरणे यांनी नगराध्यक्षपदासाठी भरत शहा यांना मत रुपी आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले. “भरत शहा नगराध्यक्ष झाले तर विकासाचा निधी अधिक मिळेल,” असे ते म्हणाले.
महिलांसाठी विशेष योजनांचा उल्लेख...
महिला मतदारांना उद्देशून त्यांनी सांगितले, “मी चमकोगिरी करणारा नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महिलांसाठी अनेक योजना दिल्या आहेत, त्याचा लाभ तुम्हाला मिळवून देणारे काम मी करतो.”
क्रीडा संकुलासाठी 56 कोटी मंजूर...
क्रीडा मंत्री पद जाण्याची चाहूल असतानाही इंदापूरसाठी 56 कोटींचे क्रीडा संकुल मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.सभेच्या शेवटी हात जोडून ते म्हणाले,“भरत शहा आणि आमचे नगरसेवक उमेदवार निवडून द्या; विकास कसा करायचा ते मी दाखवेन.”इंदापूरातील या सभेत भरणे यांच्या भाषणाला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.
What's Your Reaction?