इंदापूर नगरपरिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मंजूर , पायाभूत सुविधांसह उत्पन्न वाढीस प्राधान्य : नगराध्यक्ष भरत शहा

Feb 27, 2026 - 18:34
Feb 27, 2026 - 18:36
 0  456
इंदापूर नगरपरिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मंजूर , पायाभूत सुविधांसह उत्पन्न वाढीस प्राधान्य : नगराध्यक्ष भरत शहा

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली २०२६ - २७ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम डिजिटल प्रशासन, उत्पन्न् वाढीस प्राधान्य देण्यात आले आहे.

इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्ष भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय 27 फेब्रुवारी 2026 रोजी सभा पार पडली. या वेळी नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते अनिल पवार व सर्व सदस्य तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

या अर्थसंकल्पीय सभेवेळी नगराध्यक्ष भरत शहा यांनी इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम डिजिटल प्रशासन, उत्पन्न् वाढ यास अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी, रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी अपेक्षीत उत्पन्न स्त्रोत व विकास कामांचे नियोजन या बाबत सविस्तर माहिती दिली.

इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने सन 2025-26 या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह सन 2026-27 या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. कोणतीही कर वाढ नसलेला रुपये 74,72,686/- शिलकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. 

यामध्ये मागील वर्षाची शिल्लक रु. 1,17,54,086/- असून सन 2026-27 मध्ये अंदाजे महसूली व भांडवली जमा रु 178,49,45,000/- अपेक्षित जमा धरणेत आलेली आहे. तसेच महसूली व भांडवली खर्च रुपये 178,92,26,400/- अपेक्षित धरण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत इंदापूर शहरासाठी नवीन भुयारी गटार योजना तसेच रस्ते प्रकल्प योजना मंजूर असून, त्या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. नगरपरिषदेचा स्वहिस्सा या अनुषंगाने निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यात नियमानुसार महिला बालकल्याण, दिव्यांग, दुर्बल घटक, तसेच क्रीडा महोत्सव यासाठी विशेष राखीव निधीची तरतूद केली आहे. 

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे, संगणकीकरण यासह नागरी सुविधा केंद्र अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने तरतूद. तसेच शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेऊन, प्रस्तावित शहर विकास आराखडा विचारात घेऊन नवीन रस्ते, नगरपरिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारती साठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

सदर सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सर्व सदस्यांनी सविस्तर चर्चेनंतर मांडण्यात आलेल्या तरतुदी व शिफारशीसह सर्वानुमते मंजूर केला. शहराच्या नियोजनबध्द पारदर्शक व सर्वागीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow