Indapur Politics बोरी वालचंदनगर मधून मोहोळकर की पाटील ? कोणाला संधी,कोणाचा हिरमोड? 

Jul 20, 2025 - 21:05
Jul 20, 2025 - 22:21
 0  2223
Indapur Politics बोरी वालचंदनगर मधून मोहोळकर की पाटील ? कोणाला संधी,कोणाचा हिरमोड? 

आय मिरर

सध्या इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना जाहीर झाली असून त्यानंतर कोणता गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो आणि कोण कोणाच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरतो याची प्रतीक्षा अनेकांना आहे.

असं असलं तरी इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोरी वालचंदनगर जिल्हा परिषद गटात जर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) हा आरक्षित झाला तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची खंबीर साथ सोडून विद्यमान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विजयात मोलाचा हातभार लावलेले रोहित मोहोळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट संधी देणार की पुन्हा एकदा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनाच आखाड्यात उतरवणार ? याची उत्सुकता आत्तापासूनच निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले रोहित मोहोळकर यांनी जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यावर रोहित मोहोळकर ठाम आहेत. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची नेमकी भूमिका काय राहणार हे महत्त्वाचं असणार आहे.

कै. खंडूजी मोहोळकर गुरुजी यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगीरी बजावली अगदी त्यांचाच वारसा नातू रोहित मोहोळकर जपताना पाहायला मिळत आहेत. आपल्या आजोबांचा विचारांचा वारसा जपत वसंत खंडू मोहोळकर यांचे चिरंजीव रोहित मोहोळकर हे शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिल्याने वालचंदनगर पंचक्रोशीत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

50 वर्षापासून अधिक काळ पाटील घराणं राजकारणात सक्रिय...

इंदापूर तालुक्याच्या राजकारणात कळसचं पाटील घराणं सत्तेत राहिलं. माजी आमदार स्वर्गीय गणपतराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य पद, जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सभापती यासह तालुक्याचे आमदार म्हणून दहा वर्ष प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांच्या सूनबाई वैशाली प्रतापराव पाटील या जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती देखील राहिल्या आहेत. त्यानंतर 2012 साली दत्तात्रय भरणे यांना पुणे जिल्हा परिषदेला उमेदवारी मिळाल्याने कळसच्या पाटील कुटुंबाला थांबावे लागले. दरम्यान दत्तात्रय भरणे 2014 साली विधानसभेत गेल्याने रिक्त झालेल्या जागी पुन्हा प्रतापराव पाटील यांकडे कळस गटाचे नेतृत्व आले. त्यानंतर 2017 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप यांच्या सुनबाई वंदनादेवी अविनाश घोलप यांनी त्यांना कडवे आवाहन दिले. यात दोन माजी आमदारांच्या सुनांचा सामना झाला. यातूनही वैशाली प्रतापराव पाटील विजयी झाल्या.

2024 ला भरणेंच्या विजयात मोहोळकरांचा सहभाग...

मागील काही दशके माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी ठाम असलेले मोहोळकर कुटुंब मागील 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्यापासून काही कारणास्तव दुरावले गेले. माजी मंत्री पाटील यांच्या अनेक संस्थांमध्ये मोहोळकर हे संचालक राहिलेले आहेत.

2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांच्या विजयात मोहोळकर घराण्याचा मोठा वाटा आहे. कळंब वालचंद नगर परिसरात मोहोळकर कुटुंबाच्या माध्यमातून उद्योगधंदे यासह शिक्षणाच्या संस्था नावारूपाला आल्या.रोहित मोहोळकर यांचे युवकांचे संघटन कौशल्य मजबूत असल्याने मोहोळकर घराण्याला मानणारा मोठा वर्ग परिसरात आहे. 

दोन्ही उमेदवारांकडे मताधिक्याचं बलाबल...

पूर्वीच्या कळस वालचंदनगर जिल्हा परिषद गटात धनगर मताधिक्याचा प्रभाव होता.त्यामुळे या गटात उमेदवार देताना त्याच प्रवर्गातील मताधिक्य मिळवणारा द्यावा लागत होता.आता नवीन गट आणि गण रचना झाल्याने कळस मध्ये धनगर समाजातील मतांचा प्रभाव अधिक आहे तर बोरी मध्ये माळी समाजचे प्राबल्य जास्त आहे. अंथुर्णे भरणेवाडी मध्ये जवळपास चाळीस टक्के माळी समाजाचं मताधिक्य आहे तर उर्वरित मते धनगर व इतर समाजाची आहेत.जंक्शन, आनंदनगर, वालचंदनगर या परिसरात मोहोळकरांच प्रस्त आहे.एकूणच नवीन गट आणि गण रचनेचा विचार करता दोन्ही उमेदवारांचं बालाबल मजबूत आहे. 

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोहोळकरांचा नावलौकिक...

वालचंदनगरच्या पट्ट्यात मोहोळकर कुटुंबाचं नाव आदर्श उद्योजक म्हणून गणले जाते, वालचंदनगर च्या पट्ट्यात मोहोळकर कुटुंबाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष दहीहंडी उत्सव,रक्तदान शिबिर,नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात. विशेष बाब म्हणजे गेल्या वीस वर्षापासून मोहोळकर कुटुंबाकडून खास मुस्लिम बांधवांना रोजा इतर पार्टी दिली जाते.जेष्ठ नागरिक व महिलांसाठी स्वखर्चातून सिमेंटच्या बाकडाची व्यवस्था ही मोहोळकर कुटुंबाच्या माध्यमातून झाली. अनेक लक्षवेधी कामे मोहोळकर कुटुंबाच्या माध्यमातून झाली आहेत.

गरजू व होतकरू विद्याथ्यांना शैक्षणिक मदत,खेळांडूना प्रोस्ताहन व मदत, विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन पर व्याख्यानांचे आयोजन केले जाते. प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख,वसंत हंकारे यासोबतच समाजप्रबोधनकार इंदुरीकर यांसारखे वक्ते आपल्या भागात आणून समाज जागृत करण्याचं काम मोहोळकर कुटुंबाच्या माध्यमातून आजपर्यंत झाल आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कार्याची दखल...

26 जानेवारी 2025 रोजी जंक्शन येथील सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.यात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेत मोहोळकर कुटुंबाचे कौतुक केलं.एखादा निर्णय घेतलेला असतो तर तो दूरची दृष्टी ठेवून घेतलेला असतो याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय खंडूजी मोहोळकर गुरुजी होय असं अजित पवार म्हणाले.शिक्षणाची कवाडे खुली करण्याचं काम त्यांनी खऱ्या अर्थाने केले.एक एकर जागेत हे विश्व उभा करण्याचा प्रयत्न मोहोळकर परिवाराने केला आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर शून्यातून विश्व कसे निर्माण करता येते हे शिकायला मिळते. 1999 ला स्थापन झालेल्या या संस्थेने अनेक विद्यार्थी अधिकारी घडवले.स्वतःच्या प्रयत्नातून एक शिक्षक हे सर्व करू शकतो हे त्यांनी अवघ्या जिल्ह्याला दाखवून दिले. असे गौरवोद्गार अजित पवार यांनी काढले होते.

विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश...

गेल्या वीस वर्षापासून मोहोळ कर कुटुंब माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खांदे समर्थक मानले जात होते. वसंतराव मोहोळकर यांचे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत मोहोळकर कुटुंबाने नेहमीच पाटील यांना मोलाची साथ दिली. मोहोळकर कुटुंबाच्या जोरावरच हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील आपला वट कायम राखला. मात्र 2024 च्या विधानसभेच्या दरम्यान राजकारणात मोठी उलथापालन झाली आणि गेल्या अनेक वर्षांची साथ सोडत मोहोळकर कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर 2024 ला दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय झाला. यात वालचंदनगर पट्ट्यातून दत्तात्रय भरणे यांना मताधिक्य मिळवून देण्यात मोहोळकर कुटुंबाचे मोठे योगदान आहे.

रोहित वसंतराव मोहोळकर यांची कारकीर्द...

  • 2016 साली उपसरपंच, आनंदनगर ग्रामपंचायत
  • 2017 साली संचालक, कृषी उत्पन्न बाजार समीती, इंदापूर
  • 2022 साली सरपंच, आनंदनगर ग्रामपंचायत
  • 2023 साली उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समीती इंदापूर
  • 2024 साली चेअरमन, खंडूजी मोहोळकर विविध कार्यकारी सोसायटी, जंक्शन
  • 2024 साली भाजपा मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश

रोहित मोहोळकर यांचं शैक्षणिक क्षेत्रात योगदान...

  • 2006 ते 2010 संचालक सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्था, जंक्शन
  • 2010 पासून सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्था, जंक्शन येथे सचिव म्हणून कार्यरत
  • 2019 पासून नंदिकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, दगडवाडी संस्थेच्या अंतर्गत नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,जंक्शन,ता.इंदापूर या संस्थेवर संचालक
  • कलावती मोहोळकर प्राथ. शाळा, जंक्शन, ता. इंदापूर
  • महात्मा जोतीराव फुले वि‌द्यालय, मोरवाड, करमाळा
  • प्रल्हाद महाराज वि‌द्यालय चोरचीवाडी ता.श्रीगोंदा
  • शंभू महाराज वि‌द्यालय, दगडवाडी, ता.इंदापूर या संस्थांमध्ये योगदान.

बोरी वालचंदनगर जिल्हा परिषद गटात या गावांचा समावेश....

बोरी गण : बोरी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, बिरंगूडवाडी, जंक्शन, आनंदनगर, भरणेवाडी.

वालचंदनगर गण : वालचंदनगर, अंथुर्णे, रणमोडवाडी, कळंब.

बोरी वालचंदनगर जिल्हा परिषद गटातून प्रभावी चेहरे...

प्रतापराव पाटील, रोहित मोहोळकर, प्रदीप पाटील, कुमार गायकवाड, सागर मिसाळ, राजकुमार भोसले, दत्तात्रय फडतरे, युवराज मस्के,सत्यशील पाटील,सुहास डोंबळे यांसह इतरही अनेक प्रभावी चेहरे बोरी वालचंदनगर जिल्हा परिषद गटातून विविध पक्षांमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी असल्याने हा जिल्हा परिषद गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो त्यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow