इंदापुरात युरियाचा तुटवडा ? युरिया मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी !

Aug 13, 2025 - 12:09
 0  141
इंदापुरात युरियाचा तुटवडा ? युरिया मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी !

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर मध्ये शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा जाणू लागलाय, खत विक्रेत्यांकडून युरिया मिळत नसल्याच्या काही तक्रारी शेतकऱ्यांमधून पुढे आल्या आहेत. सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून युरियाचा तुटवडा भासत असल्याने आणि खत विक्रेत्यांकडे युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

युरियाचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या मधून समोर येत असताना काही दुकानदारांनी देखील नाव न सांगण्याच्या अटीवर याला दूजोरा दिला आहे.

युरियाची खरेदी करताना काही कंपन्या इतर खते लिंकिंग करत असल्याचं खूप विक्रेत्यांनी म्हटलं आहे.युरिया घ्यायचा असेल तर 10:26: 26 अगर 15:15:15 सारखी मिश्र खते घ्यावी लागतील अशा अटी कंपन्या घालत आहेत त्यामुळे युरिया खरेदी करण्यात अडचणी येत असल्याच खत विक्रेत्यांनी म्हटल आहे.

याच मुद्द्यावरून पुणे जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष एडवोकेट श्रीकांत करे यांनी देखील सरकार वरती हल्लाबोल केला आहे.पुणे जिल्हा शेतकरी सुकाणू समिती अध्यक्ष एडवोकेट श्रीकांत करे म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे.नेहमी येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा भासू लागला आहे. शेतकऱ्यांवर विक्रेत्यांकडून इतर मिश्र खतांची लिंकिंग सक्तीची केली जात आहे. सरकारने या बाबीकडे तात्काळ लक्ष दिले पाहिजे.

युरिया सारख्या खताचा गैरवापर केला जात आहे. युरिया हे खत पशुखाद्यात किंवा दुधामध्ये वापरले जाते, हा गैरवापर थांबवण्यात यावा. खरिप सारख्या महत्त्वाच्या हंगामात शेतकऱ्यांना युरिया हे खत तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. शिवाय खत विक्रेते युरिया खतावर इतर मिश्र खतांची लिंकिंग करत इतर खत घेणे सक्तीचे करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एडवोकेट श्रीकांत करे यांनी केली आहे.

दरम्यान या संदर्भात इंदापूर तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांना विचारले असता ते म्हणाले की, मंगळवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी इंदापूर कृषी विभागाने तालुक्यातील खत विक्रेत्यांची बैठक घेत कृत्रिम रित्या कुठेही युरिया खताची अडचण येऊ देऊ नये अशा सक्त सूचना केल्या आहेत. जर जाणीवपूर्वक कोण युरिया खताची टंचाई निर्माण करत असेल तर त्यावरती कारवाईसाठी प्रस्ताव पाठवले जातील,असा इशाराही देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना युरिया खत मिळण्यासंदर्भात अडचणी येत असतील तर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन गरगडे यांनी केलं आहे. शिवाय शेतकऱ्यांना आवश्यक असेल तेवढाच युरिया शेतकऱ्यांनी खरेदी करावा जास्तीचा युरिया खरेदी करून त्याची साठवणूक करून ठेवू नये ज्यामुळे इतर शेतकऱ्यांना युरिया खत मिळण्यास अडचणी निर्माण होतील असं आवाहन ही तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow