मोठी बातमी | इंदापुरात वरकुटे बुद्रुक लोणी देवकर च्या शिवेवर 35 एकर ऊस जळाला...

Oct 13, 2025 - 17:30
 0  1499
मोठी बातमी | इंदापुरात वरकुटे बुद्रुक लोणी देवकर च्या शिवेवर 35 एकर ऊस जळाला...

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर मधून मोठी बातमी आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि लोणी देवकर गावाच्या शिवेवर शॉर्ट सर्किट होऊन तब्बल 35 एकरहून अधिक तोडणीस आलेला ऊस जळून खाक झालाय. याआगीत ठिबक सिंचन यंत्रणादेखील जळून खाक झाली आहे.या घटनेत लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

आज भर दुपारी एक वाजता च्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागण्याची प्राथमिक माहिती आहे. जळालेला संपूर्ण ऊस तोडणी आला होता. पुढील महिनाभराच्या आत गाळप हंगाम सुरू होताच तो कारखान्यास गाळपास गेला असता मात्र अचानक आग लागून तो खाक झाल्याने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.

या लागलेल्या आगीत सुनिता बलभीम शिंदे तीन एकर,रूपाली सुनील शिंदे पाच एकर,राजेंद्र ज्ञानदेव देवकर सहा एकर,राधाबाई मारुती फाळके चार एकर,शोभा न्यानदेव भोसले दोन एकर, अमोल गोरख राखुंडे दीड एकर,सचिन गोरख राखुंडे दीड एकर,दत्तात्रय नवनाथ राखुंडे अडीच एकर यांसह इतर शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याची माहिती सुनील शिंदे, गोरख राखुंडे यांनी दिली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,आडसाली हंगामातील हा ऊस होता, एकरी अंदाजे 70 ते 80 टन उत्पादन निघाला असतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या दुर्घटनेत लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय.

आग लागल्यानंतर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र भर दुपारची वेळ होती वाऱ्याचा झोत होता त्यामुळे काही समजण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केलं. बघता बघता आगीचे लोट बाहेर पडले आणि तासाभराच्या आत 35 एकर हून अधिक क्षेत्र जळून खाक झालं. 

गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने आग लागलेल्या उसात आणि शेजारील उसात काही अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान आग विझवण्यासाठी शेतकऱ्यांनी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करण्याचाही प्रयत्न केला मात्र ती होऊ शकली नाही. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून ठोस मदत करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow