इंदापूरला परतीच्या पावसानं झोडपलं ! सणसरला पूर जोड कालव्याला भगदाड ; वाचा आणखी कुठे कुठे काय काय घडलं
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. इंदापूर तालुक्यातील सणसर गावाचा ओढा तुडुंब भरून वाहिला तर अनेकांच्या घरात या ओढ्याचं पाणी शिरल्याने अतोनात हाल झाले. संसार गावातील ओढ्याकाटचे कुटुंबातील सदस्य झोपेत असतानाच या ओढ्याचं पाणी घरांमध्ये घुसलं आणि मध्यरात्रीच एकच गोंधळ उडाला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, प्रांताधिकारी वैभव नावडकर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सणसर येथे भेट देत नुकसानीची पाहणी केली असून तातडीने प्रशासनाने पाण्यामुळे झालेल्या घराच्या आणि शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना भरणे यांनी दिल्या आहेत.
सणसर ग्रामस्थांचा मंत्री भरणेंसमोर संताप...
मे 2025 मध्ये इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती याच दरम्यान 25 ते 27 मे दरम्यान शेटफळगडे परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे काही पाणी भिगवण बाजूला राहिले तर काही पाणी अलीकडे सणसर बाजूला वाहून आले. याच वेळी संसार मधील असणाऱ्या या ओढ्याला महापूर आला होता. अनेकांच्या घरांमध्ये या ओढ्याचं पाणी घुसलं होतं तर कित्येकांच्या शेतीचं उभ्या पिकांचे या पाण्याने नुकसान केलं होतं.
याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात पावसाच्या महाप्रलयामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. प्रशासनाने पंचनामे करीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत ही दिली होती. मात्र ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे होऊन देखील काहींना मदत मिळाली तर काहींचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.
दरम्यान याचवेळी अजित पवारांनी सणसर येथील पूर परिस्थितीची पाहणी करत काही सूचना केल्या होत्या. मात्र पावसाळी परिस्थिती असल्याने या सूचनांची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी परतीचा पाऊस राज्यात सुरू झाला असून गेल्या दोन दिवसात इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सणसर येथील ओढ्याला महापुराचे रौद्ररूप पाहायला मिळालं. अनेकांच्या शेतात घरात या ओढ्याचं पाणी घुसलं आणि पुन्हा मे महिन्यात निर्माण झाली होती तीच परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पाहणी करण्यास आलेल्या मंत्रि दत्तात्रय भरणे यांच्यासमोर सणसर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
नागरिकांच्या मागणीनंतर ओढा खोलीकरणाचे भरणे यांचे निर्देश....
सातत्याने या ओढ्याला महापूर येतो आणि आमच्या घरांमध्ये पाणी घुसतं आमच्या शेतीचा नुकसान होतं शासन कधी यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहे असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला. पाठीमागे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण पाहणी केली होती त्यावेळी काही सूचना अजित पवार यांनी दिल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचाही ग्रामस्थांनी सांगितलं.
तातडीने या ओढ्याच्या ठिकाणी टाकण्यात आलेली माती उपसण्यात यावी याशिवाय या ओढ्याचं खोलीकरण करण्यात यावं अशी प्रमुख मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली. यावर पावसाळा संपताच तातडीने या कोड्याचे खोलीकरण केले जाईल तशा पद्धतीने प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
पावसामुळे नुकसान झालेल्या घराचे आणि शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश...
ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असेल पिकाची नुकसान झाले असेल जमीन वाहून गेले असेल किंवा पावसामुळे घराचे नुकसान झाले असेल अशा ठिकाणी तातडीने प्रशासनाने भेट देऊन पंचनामे करावी या प्रक्रियेमध्ये घराच्या नुकसानीला सर्वात प्रथम प्राधान्य द्यावे अशा सूचना ही मंत्री भरणे यांनी प्रशासनाला केले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून लवकरात लवकर योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन ही भरणे यांनी दिलं आहे.
खडकवासला कॅनॉल चा जोड कालवा फुटल्याने मोठी आपबीती...
इंदापूर तालुक्याला निरा डाबा कालबाणी खडकवासला उजवा कालव्यामधून शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. सध्या या दोन्ही कार्यावरची आवर्तने बंद आहेत. मात्र शेटफळकडे परिसरात एका दिवसात जवळपास 156 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हे सर्व पाणी खडकवासला उजवा कालव्यामध्ये येऊन वाहू लागले हा पाऊस एवढा मोठा होता की पुढे खडकवासला वरून असणारा सणसर जोड कालवा शिंदेवाडी येथील झगडे वस्ती येथे फुटला गेला. केवळ पावसाच्या पाण्यामुळे हा कालवा या ठिकाणी फुटला गेला आणि हे सर्व पाणी पुढे सणसर येथील ओढ्याला जाऊन मिळाले. ज्यामुळे सणसर गावात ओढ्याला महापूर आला. या दुर्घटनेनंतर मंत्री भरणे यांनी ज्या ज्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या आवश्यकता असतील त्या सर्व केल्या जातील प्रशासन कुठेही कमी पडणार नाही असं आश्वासित केलं आहे.
तरंगावाडीतील ओढा भरून वाहिल्याने जमिनींना आलं तळ्याचे स्वरूप...
इंदापूरच्या तरंगावाडी परिसरात असणारा ओढा भरून वाहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलं आहे. पावसाच्या या पाण्यामुळे याच परिसरातील नायकुडे यांची तब्बल सहा एकर शेती असून त्यातील जवळपास चार एकर शेत पाणीखाली गेले असून शेतीला जणू काही तळ्याचे स्वरूप आलं आहे. याशिवाय इतर शेतकऱ्यांची आहे शेतीचा आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
बस स्थानकातील व्यापारी संकुल आवारात पाणीच पाणी...
इंदापूर शहरात मोठा पाऊस झाला या पावसामुळे इंदापूर शहरातील बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसराला नदी नाल्याचे स्वरूप आले होते.या व्यापारी संकुल परिसरात गुडघाभर पाणी साठलं होत.काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये देखील हे पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची नुकसान देखील झाले. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यापारी संकुलातील ड्रेनेच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. व्यापारणी याबाबतीत उठावही केला मात्र अद्यापही नगरपरिषद त्यावरती तोडगा काढू शकलेली नाही. त्यामुळे आता तरी या गंभीर प्रश्नाकडे तालुक्याचे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का हा देखील प्रश्न आहे.
बाभुळगाव रस्त्यावरील ओढ्याला आला पूर...
इंदापुर तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे यामुळे ओढे नालेत तुडुंब भरून वाहू लागले.बाभुळगावला जाणारा मार्ग काही कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद पडला होता. पुणे सोलापूर महामार्ग ते बाभुळगाव या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद पडला होता.
इंदापूर शहरातील तापी परिसर पुन्हा जलमय...
इंदापूर शहरातील तापी आपारमेंट परिसराला पुन्हा नदी नाल्याचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणच्या ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून काही उपाययोजना केल्या जात आहेत मात्र अद्याप हा प्रश्न कायमचा सुटलेला नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या ठिकाणी तळीच्या तळी साठली जातात. काल पुन्हा हेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे पानदरा आणि कासार पट्टा परिसरातही अशाच पद्धतीने पावसाच्या पाण्याचा महाप्रलय पाहायला मिळाला आणि रस्ते पाण्याने अक्षरशा तुंबले गेले.या संदर्भात मंत्री भरणे यांनी तातडीने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला जाईल प्रयत्न सुरू असल्याचे म्हटलं आहे.
What's Your Reaction?