विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू ; भिगवण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा
आय मिरर (निलेश मोरे)
विजेच्या खांबावर अनधिकृतरीत्या वायर टाकून ढाब्याच्या बोर्डाचे काम करत असताना एका तरुणाला वायर हलविण्यास सांगितल्यामुळे विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहित मच्छिंद्र कसबे (वय २८, धंदा चालक, रा. मदनवाडी-चौफुला, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष उर्फ मुकेश पवार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) व बळीराजा ढाब्याचे मालक सागर खाडे (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मौजे भादलवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत बळीराजा ढाब्यासमोर ही घटना घडली. त्या वेळी आरोपी ढाब्याच्या नावाचा लोखंडी बोर्ड बसविण्याचे काम करत होते. यासाठी त्यांनी महावितरणच्या विजेच्या खांबावर अनधिकृतरीत्या इलेक्ट्रिक वायर टाकली होती.
त्यावेळी फिर्यादीचा भाऊ सौरभ मच्छिंद्र कसबे (वय २६, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) तेथे उपस्थित होता. आरोपींनी त्याला वायर हलवून विजेचा आकडा खाली पाडण्यास सांगितले. सौरभ यांनी मला असे काम जमत नाही असे सांगितले असतानाही आरोपींनी फक्त वायर धरून हलवली तर आकडा खाली पडेल असे सांगून तसे करण्यास प्रवृत्त केले.
त्यावर सौरभ कसबे यांनी उजव्या हाताने वायर पकडून ती हलवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना, छातीला व पाठीला गंभीर भाजल्या गेल्या.
त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना ५ मार्च रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, उपचारासाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाबाबत पैसे मागितले असता आरोपींनी फिर्यादी रोहित कसबे व त्यांची बहीण आरती यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच “तुम्हाला काय तक्रार द्यायची ते द्या" असे म्हणत आरती हिला धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, विजेच्या खांबावर अनधिकृतरीत्या वायर टाकल्याचा प्रकार गंभीर मानला जात असून याबाबत महावितरणकडूनही स्वतंत्र कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारगड करीत आहेत.
What's Your Reaction?