जेजुरीत भंडाऱ्याच्या भडका,प्रशासनाने तपासणी करता नमुने घेतले ! बेळगाव वरून भंडारा पुरवठा करणारा टेम्पो ही ताब्यात
आय मिरर
21 डिसेंबर रोजी पुण्याच्या जेजुरीमध्ये दुपारी तीनच्या सुमारास नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष साजरा करीत असताना भंडाऱ्याची उधळण सुरू होती आणि यावेळीच जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा उधळत असताना अचानक पिवळ्या भंडाऱ्याने पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला होता यातच 16 जण जखमी झाले होते.
यानंतर भेसळयुक्त भंडारा विक्री बाबत अन्न व औषध भेसळ प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर आला असून प्रशासनाने जेजुरीतील मुख्य महाद्वार व शहरातील विक्रेत्यांकडील भंडाऱ्याचे काही नमुने देखील ताब्यात घेतले आहेत.
प्रथमदर्शनी हा भंडारा बेळगाव मधून विक्रेत्यांना पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई करत विक्रेत्यांना बेळगाव मधून भंडारा पुरवठा करणारा टेम्पो देखील ताब्यात घेतला आहे.
अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागाचे अधिकारी वर्षा बारवकर,रजिया शेख , लक्ष्मीकांत सावळे ,डॉ.संदीप शिंदे आदींनी जेजुरीतील विक्रेत्यांकडे भंडाऱ्याचे काही पोती तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. यावेळी भंडारा पुरवठा करणारा बेळगाव वरून आलेला टेम्पो हे ताब्यात घेण्यात आलाय.
जेजुरी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, कर्मचारी अण्णासाहेब देशमुख व पोलीस पथक या कारवाई मध्ये सहभागी झाले होते.ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नेमकं काय घडलं...
मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते.गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेराया चरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना त्या ठिकाणी फटाके ही वाजत होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने जमिनीवर पडताच अचानक पेट घेतला आणि त्याचा स्फोटही झाला. या घटनेत 16 जण भाजले गेले. काहींना किरकोळ इजा पोहोचली तर काहींना गंभीर इजा पोहोचली. जखमींपैकी काहींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलाय तर काहींवर पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
What's Your Reaction?