रोहित पवारांची राष्ट्रवादीच्या शिबिराला दांडी ; चर्चा रंगताच म्हणाले…
आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिराला बुधवार पासून सुरुवात झाली आहे.मात्र या शिबिराच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवारांनी दांडी मारल्याने चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. यावर ट्विट करीत रोहित पवारांनी खुलासा केला आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या या शिबिराला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या शिबिरात राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहीत खुलासा केला आहे.
शिबिरातील अनुपस्थितीचं कारण सांगताना रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये," असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे. तसंच "आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू," असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?