इंदापूरातील विद्या प्रतिष्ठान कॉलेज राबवणार सायबर सिक्युरिटी व सायबर क्राईम अवेयरनेस प्रोग्राम

Jan 30, 2024 - 21:33
Jan 30, 2024 - 21:36
 0  118
इंदापूरातील विद्या प्रतिष्ठान कॉलेज राबवणार सायबर सिक्युरिटी व सायबर क्राईम अवेयरनेस प्रोग्राम

आय मिरर(देवा राखुंडे)

सायबर सिक्युरिटी मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरच्या अडचणीचा विचार त्या सोडवण्यासाठी आता इंदापूरातील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजने एक पाऊल उचलले आहे. इंदापूर पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजात सायबर सिक्युरिटी व सायबर क्राईम अवेयरनेस प्रोग्राम येत्या फेब्रुवारी महिण्यात घेण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे यांनी मंगळवारी दि.३० जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आज कालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु जेवढे गुन्हे घडलेले आहेत त्यापैकी साधारण 2 ते 3 टक्के पर्यंतचे गुन्हे दाखल होतात. सायबर गुन्ह्यांविषयी असणाऱ्या अज्ञानामुळे किंवा भीतीमुळे बरेच नागरिक गुन्हे दाखल करण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे सायबर सिक्युरिटी मध्ये काम करणाऱ्या टेक्निकल व्यक्तींना हे काम करण्यासाठी योग्य तेवढी माहिती (data for analysis) उपलब्ध होत नाही.त्यामुळे आम्ही याविषयी जनजागृती करण्यासाठी इंदापूर पोलीस, पंचायत समिती आणि संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य डॉ.देशपांडे यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार असून या कार्यक्रमांतर्गत सायबर क्राईम्स आणि सायबर सिक्युरिटी याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करण्यात येईल.सामान्यतः लोकांना फक्त आर्थिक फसवणूक हाच सायबर क्राईम माहिती असतो, परंतु वेगवेगळ्या समाज माध्यमातून अफवा पसरवणे किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमातील उपलब्ध छायाचित्रांचा किंवा व्यक्तिगत माहितीचा दुरुपयोग करून एखाद्या व्यक्तीच चारित्र्य हनन करणे किंवा इतर कोणती तरी वाईट माहिती पसरवणे असेही प्रकार यामध्ये होत असतात. परंतु सायबर सिक्युरिटी मधील माहिती नसल्यामुळे याविषयी गुन्हे दाखल करण्यास सामान्य व्यक्ती धजावत नाही, जनमानसामध्ये सायबर सिक्युरिटी ही गोष्ट दुर्लक्षितच राहिलेली आहे.

या गोष्टीचा विचार करता विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजात इंदापूर तालुक्यातील माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधींच्या मार्फत याविषयी जागृती निर्माण करून ही माहिती विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे.येणाऱ्या काळात विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमधून सायबर क्राईम व सिक्युरिटी विषयी समुपदेशन व मार्गदर्शन होईल.तसेच विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे सेंटर ऑफ एक्सलन्स च्या माध्यमातून टेक्निकल सपोर्ट घेऊन सायबर क्राईम आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच या सर्व माहितीचा खजिना या क्षेत्रात काम करणा-या लोकांसाठी उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून हे गुन्हे उकलण्यात व आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

या सर्व प्रक्रियेमध्ये विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक चा स्टाफ व विद्यार्थी हे सहभागी होऊन काम करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. संतोष देवकाते व प्रा संज्योत पाटील हे करणार आहे.

या कार्यक्रमासाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, इंदापूर पंचायत समितीचे बीडीओ विजयकुमार परीट तसेच सायबर सिक्युरिटी मधील तंत्रज्ञ व मार्गदर्शक या कार्यशाळेत येऊन सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow