बिग ब्रेकिंग | बारामतीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेक
आय मिरर
बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावरती भीमसैनिकांनी शाही फेक केली आहे. प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नसल्याच्या कारणामुळे भीमसैनिकांनी आक्रमक होत ही शाई फेक केली आहे. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला नसल्याने आज विविध संघटनानी एकत्रित आंदोलन केलं.सकाळी आंदोलन केल्यानंतर दुपारी सचिन सातव यांच्यावर ही शाई फेक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणी बहुजन समाज पार्टीचे नेते काळुराम चौधरी यांनीही निषेध नोंदवला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल आहे.
या संपूर्ण प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी ही राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली आहे.दि. 26 जानेवारी 2026 रोजी बारामती नगरपालिकेत आयोजित अधिकृत प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभात राष्ट्रीय ध्वज संहिता, 2002 चे उल्लंघन,तसेच भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा जाणीवपूर्वक अवमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप युवा मोर्चाने केला आहे.
तक्रारीत काय म्हटलं...
अधिकृत ध्वजारोहण समारंभस्थळी श्रद्धांजली अर्पणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो/प्रतिमा ठेवण्यात आलेली नव्हती, तर केवळ महात्मा गांधी यांचा फोटो प्रदर्शित करण्यात आला.याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता,“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवण्याबाबत कोणतीही राजपत्रातील (Gazette) अधिसूचना किंवा प्रोटोकॉल नाही”असे तोंडी उत्तर देण्यात आले असा आरोप भाजपा युवा मोर्चाच्या लेखी तक्रारीत करण्यात आला आहे.
मात्र, या दाव्यास कोणताही लेखी आदेश, शासन निर्णय किंवा नियमाचा संदर्भ देण्यात आलेला नाही.याच समारंभात राष्ट्रीय ध्वजाची सलामी दोन वेळा देण्यात आली.एकदा ध्वजारोहणापूर्वी
व दुसऱ्यांदा ध्वजारोहणानंतर ही बाब भारताचा ध्वज संहिता, 2002 च्या स्पष्ट तरतुदींना विरोधात आहे. नियमानुसार ध्वजारोहणानंतर, राष्ट्रीय गायनाच्या वेळी एकदाच सलामी देणे अपेक्षित असते.
संविधानिक व सामाजिक असंवेदनशीलतेचा आरोप...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण राष्ट्राचे संविधानिक प्रतीक आहेत. कोणत्याही अधिकृत नागरी समारंभातून त्यांची प्रतिमा वगळणे ही कृती मनमानी भेदभावपूर्ण संविधानिक नैतिकतेला बाधा आणणारी असून,यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप भाजपा युवा मोर्चाने केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
भाजप युवा मोर्चाच्या प्रमुख मागण्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा वगळण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण घेण्यात यावे.अधिकृत समारंभांसाठी लागू असलेल्या प्रोटोकॉलची स्पष्ट माहिती सार्वजनिक करावी.ध्वजारोहण प्रक्रियेत झालेल्या उल्लंघनाबाबत विभागीय चौकशी (Departmental Inquiry) करण्यात यावी.भविष्यात सर्व शासकीय कार्यक्रम समावेशक, संविधान-सन्मान राखणारे व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील पद्धतीने पार पाडण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत.
What's Your Reaction?