लक्ष्मण हाकेंना बारामतीत येण्यास अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा विरोध ! पोलिसांकडे केली ही मागणी
आय मिरर
ओबीसींचे नेते प्रा.लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसापासून सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना निशाणा करत आहेत. आज लक्ष्मण हाके हे बारामती मध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. मात्र तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बारामतीत येण्यापासून मज्जाव करावा अशा आशयाचं निवेदन बारामती पोलीस ठाण्यात दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे हाके आता बारामतीत येणार की पोलीस त्यांना मज्जाव करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज जर लक्ष्मण हाके यांनी बारामतीत येऊन अजित पवारांच्या विरोधात कोणत आक्षेपार्ह विधान केलं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी या पत्राद्वारे पोलिसांकडे करण्यात आल्याची माहिती आहे. बारामतीत आल्यानंतर आज उद्या लक्ष्मण हाके अजित पवारांच्या विरोधात काय बोलतात का ? किंवा लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध होतो का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
'जे पेरलं होतं, तेच आता उगवलं आहे'...
अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेकडून हल्ला झालेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर ही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत जात वर्चस्वाला प्राधान्य दिले. हिंसाचाराचे सामान्यीकरण केले. संभाजी ब्रिगेडने बहुजनांच्या नावाने राजकारण करुन वतनतदारांना सत्तेत बसवलं. संभाजी ब्रिगेडने 'जे पेरलं होतं, तेच आता उगवलं आहे', अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. हाके यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या सगळ्यावर सविस्तर भाष्य केले आहे.
संभाजी ब्रिगडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. कोणतीही मागणी, मांडणी, वैचारिक लढाई संविधााच्याच चौकटीत झाली पाहिजे. या मताचा मी आहे मात्र ही चौकट मोडून रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडल्या आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची तोडफोड, वाघ्याचे स्मारक उखडून दरीत फेकणे, गडकरींचा पुतळा उध्वस्त करणे, शाईफेक करणे, फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या समाजिक चळवळी बदनाम करणे, उपेक्षितांच्या लढा लढणाऱ्यांच्या गाड्या फोडणे, अशा शेकडो घटना आहेत. ब्रिगेडने हिंसाचाराचं सामान्यीकरण केलं. हिंसाचार माजवणाऱ्यांचे खुले सत्कार केले, बक्षीसं जाहीर केली. आता ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवर ही वेळ आली. उपेक्षित आणि विस्थापितांच्या विकासाच्या वाटेवर बाभळ पेरण्याचं काम ब्रिगेडनं केलं. तेच काटे ब्रिगेडच्या वाट्याला आलेत. पेरलं ते उगवलं यालाच म्हणतात, अशी टिप्पणी लक्ष्मण हाके यांनी केली.
मी शंभर शिव्या देईल, माफी मागणार नाही...
गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील एका कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. मात्र, मी शंभर शिव्या देईल, माफी मागणार नाही, अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत लक्ष्मण हाके सातत्याने हेतूपरस्पर शिवराळ भाषेत वक्तव्य आहेत. असा मुद्दा पुढे करत बारामतीतील नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. हाके यांनी सात दिवसात त्यांनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?