पैशाच्या वसुलीसाठी ऊसतोड मुकादमाला बसवून ठेवलं ; मुकादमाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
आय मिरर
ऊस तोडणीसाठी दिलेले एक लाख रुपये परत वसूल करण्यासाठी ऊसतोड मुकादमाला जबरदस्तीने घरी बसवून ठेवल्याने ताण तणावातून ब्लड प्रेशर लो होऊन आणि शुगर वाढून ऊसतोड मुकादमचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या इंदापूर तालुक्यात घडली आहे.
इंदापूर तालुक्यातील अकोले गावात 22 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळू खाडे आणि तुषार दराडे अशी आरोपींची नावे असून भिगवण पोलिसांनी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे या घटनेत तुषार दराडे हे पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून तो ह्या गुन्ह्यात असल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नाथा पांडुरंग कवटेकर असं मृत्यू झालेल्या 56 वर्षीय ऊसतोड मुकादमाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिठी गावचा आहे. मयताचा मुलगा विनोद नाथा कवटेकर याच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत कवटेकर हे ऊसतोड मजुरीचे काम करतात. सध्या ते गेवराई तालुक्यातील गढी सहकारी साखर कारखाना येथे राहायला होते. दिनांक 21 सप्टेंबर रोजी हा एक लाख रुपयाचा व्यवहार मिटवण्यासाठी ते आरोपींच्या गावी आले होते. यावेळी आरोपींनी कवटेकर यांच्याकडून 57 हजार रुपये फोन पे द्वारे वसूल केले. उर्वरित 43 हजार रुपये वसुलीसाठी कवठेकर याला आरोपींनी त्यांच्या अकोले येथील घरी बसवून ठेवलं असा आरोप कवटेकर यांच्या कुटुंबीयांचा आहे.
दरम्यान कवटेकर यांना शुगर आणि बीपी चा त्रास होता. हे आरोपींना माहीत होतं. मात्र अस असतानाही आरोपींनी कवटेकर यांना उर्वरित पैशाच्या वसुलीसाठी त्यांच्या घरी बसवून ठेवलं.ताणतणावामुळे कवटेकर यांचा बीपी लो झाला आणि शुगर वाढली. यातूनच कवटेकर यांचा मृत्यू झाल्याची तक्रार भिगवण पोलिसात कवटेकर यांच्या मुलांना दाखल केली आहे.
दरम्यान भिगवण पोलिसांनी या प्रकरणी दोघा आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून या दोघांनाही अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
What's Your Reaction?