दौंड मध्ये अज्ञात चोरट्याने फोडलं पोलीस हवालदाराचं घर ! लाखो रुपयांचा ऐवज लुटला

Mar 30, 2026 - 18:36
Mar 30, 2026 - 18:37
 0  881
दौंड मध्ये अज्ञात चोरट्याने फोडलं पोलीस हवालदाराचं घर ! लाखो रुपयांचा ऐवज लुटला

आय मिरर 

दौंड तालुक्यातील बालाजीनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 03 मध्ये ही चोरी झाली आहे. सोमनाथ खाडे हे कुटुंबासह सोलापूर येथे गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी लाकडी कपाटे उघडून सोन्याचे दागिने चांदीचे साहित्य आणि 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 75 हजारांचा मुद्देमाल चोरी केला.

या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

नक्की काय घडलं ?

फिर्यादी सोमनाथ खाडे हे त्यांच्या कुटुंबासह दौंड तालुक्यातील बालाजी नगर परिसरातील स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक तीन मध्ये राहतात. सोमनाथ खाडे हे रायगड पोलीस दलात पोलीस हवालदार या पदावर नेमणुकीस आहेत. मात्र सध्या तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे ते कार्यरत आहेत. 

22 मार्च 2026 रोजी सकाळी आठच्या सुमारास सोमनाथ खाडे हे त्यांच्या कुटुंबासह सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या घराला टाळा लावला होता. 27 मार्च 2026 रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनी तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप दिसत नसून दरवाजा उघडा दिसत आहे असं सांगितलं. 

यानंतर फिर्यादी सोमनाथ खाडे त्यांच्या कुटुंबीयांसह रात्री बाराच्या सुमारास दौंड मधील स्वामी समर्थ अपार्टमेंट मध्ये त्यांच्या फ्लॅट क्रमांक तीन या ठिकाणी घरी पोहोचले.त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांना घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे दिसले. जमिनीवर काही कपडे अस्ताव्यस्त पडलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.

यानंतर त्यांनी संबंधित घटनेसंदर्भात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दौंड पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow