माजी आमदार अशोक टेकवडेंवर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल ; मुलगा आणि पत्नीचा ही समावेश ! हे आहे कारण 

Sep 20, 2025 - 16:01
 0  1174
माजी आमदार अशोक टेकवडेंवर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल ; मुलगा आणि पत्नीचा ही समावेश ! हे आहे कारण 

आय मिरर 

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील सचिन गरुड या शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून सदर कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता संगनमताने पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने शिरुर पोलीस स्टेशन येथे पुरंदरचे माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह तालुकाध्यक्ष दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन संस्थांच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचा आरोप आहे.यानंतर माजी आमदार अशोक टेकवडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संबंधित कर्जदार यांनी गुळाचा व्यवसाय उभा करण्यासाठी संस्थेकडून दहा वर्षांपूर्वी कर्ज घेतलं होतं. दोन वर्षानंतर ते थकबाकी मध्ये गेले. संस्थेच कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नकारात्मकता दर्शवली तेव्हा संस्थेने त्यांना सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही केली. जवळपास त्यांना शंभर पेक्षा जास्त नोटिसा गेल्या. लिलावाच्या प्रक्रिया सुरू झाल्या. त्याच्यानंतर जामीनदारापर्यंत संस्था त्यांच्यापर्यंत पोहोचली जामीनदाराच्या दबावानंतर त्यांनी अशा प्रकारच्या पळवाटा काढण्यासाठी तक्रारी करण्याचा प्रयत्न केला. 

आमचा कायदा विभाग नक्कीच त्यामध्ये पुढे कार्यवाही करेल. अशा प्रकारचं कर्ज बुडवण्याचं धोरण असणाऱ्या लोकांच्या विरोधात असं घडत असत. परंतु संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे चाललेला असल्याने संस्था याच्यामध्ये न्यायालयाच्या समोर आवश्यक त्या गोष्टी सादर करेल आणि त्यात संस्थेच्या बाजूने निर्णय होईल.

आमच्यापर्यंत अध्याप यामधली कुठलीही माहिती आलेली नाही. आमचं म्हणणं मांडण्याची कुठलीच संधी आजपर्यंत मिळालेली नाही. वरिष्ठ न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडू संस्थेची बाजू व्यवस्थित असल्यामुळे पुढची कर्ज वसुली करण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळेल. ही लोकं यापूर्वी हायकोर्टात सुद्धा पूर्वी गेले होते. हायकोर्टाने सुद्धा त्यावेळी त्यांना धुडकावून लावले आहे. संस्थेची बाजू नक्की व्यवस्थित आहे. असं अशोक टेकावडे म्हणाले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण...

गणेगाव दुमाला ता. शिरुर येथील सचिन गरुड, त्यांच्या दोन मित्रांना २०१९ मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्ज मागणी केली असता सदर बँकेने सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करुन घेत अनेक कागदपत्रे घेतली होती.मात्र त्यांनतर सदर अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज होईल असे सांगून वेळोवेळी टाळाटाळ करत राहिले.

मात्र याच दरम्यान एका कर्जात चाळीस लाख तर एका कर्जात पंचवीस लाख असे पासष्ठ लाख रुपये कर्ज मंजूर करुन त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता परस्पर सर्व पतसंस्थेचे संस्थापक,चालक व व्यवस्थापक यांनी संगनमत करुन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करुन घेतली.

सदर कर्ज होत नसल्याने सचिन गरुड त्यांच्या शेतीकामात व्यस्त राहिले असताना २०२३ मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आली.गरुड यांनी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन चौकशी केली असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला,त्यांनतर त्यांनी याबाबत शिरुर न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने याबाबत योग्य सुनावणी घेत शिरुर पोलिसांना सदर प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow