इंदापूरचं 'शेठ' पुन्हा मैदानात ! श्री लक्ष्मी नरसिंहाला घातलं विजयाचं साकडं
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून इंदापूर नगरीचे शेठ म्हणून ओळखले जाणारे भरत शहा शहराच्या विकासासाठी पुन्हा मैदानात उतरलेत. नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून कार्यकर्त्यांनी दक्षिण प्रयाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमा आणि नीरा नदीच्या संगमावरील श्री लक्ष्मी नरसिंहाला अभिषेक घालत त्यांच्या विजयाचं साकडं घातलं आहे.
राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपरिषदा, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी अगदी कोणत्याही क्षणी पुढील आठवड्याभरात आचारसंहिता जाहीर होईल असे संकेत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.
पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेची निवडणूक आता पार पडणार असून इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. गेल्या तीन साडेतीन वर्षापासून रखडलेली निवडणूक आता पार पडणार असल्याने आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद आरक्षित झाल्याने अनेक जण नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.
इंदापूर नगरीचे शेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहा कुटुंबाच्या भूमिकेकडे गेल्या काही महिन्यांपासून शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.या निवडणुकीत शहा कुटुंबाची नेमकी काय भूमिका राहणार ? शहा परिवार कोणत्या राजकीय पक्षाबरोबर जाणार ? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत असले तरी शहा परिवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असून पुन्हा एकदा इंदापूरकरांच्या सेवेसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय.
भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात शहरातील अनेक नागरिक,व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा विक्रमी मतांनी विजयी व्हावेत, यासाठी लक्ष्मी नरसिंह देवतेस साकडे घालण्यात आले.
नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहा कुटुंबाची उल्लेखनीय कामगिरी...
2017 साली इंदापूर नगर परिषदेची निवडणूक पार पडली होती यावेळी तत्कालीन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंकिता मुकुंद शहा या काँग्रेस आयच्या चिन्हावरती इंदापूर नगर परिषदेवरती लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. अंकिता शहा या माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या थोरल्या वहिनी होत.नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात इंदापूर नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग पाच वर्षे देशपातळीवर इंदापूर नगर परिषदेचा नावलौकिक झाला आहे.शहरात नवीन व्यापारी संकुल,अत्याधुनिक नगरपरिषद भवन,शुद्ध पाण्याचा अखंड पुरवठा,शहर कचरामुक्त करण्यासाठीचे उपक्रम, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे निर्णय तसेच अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, ऑक्सिजन पार्क व बायोडायव्हर्सिटी प्रकल्पांतर्गत हजारो वृक्षांची जोपासना अशा विविध कामांमुळे शहा परिवाराचे कार्य सर्वदूर चर्चेत आहे.
यासोबतच सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सातत्यपूर्ण आयोजनामुळे शहा परिवाराने इंदापूरच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भरत शहा यांच्या नगराध्यक्ष पदाला शहरातून व्यापक पसंती मिळेल असा अंदाज आहे.
शहा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील...
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर नगरीचे शेठ म्हणून ओळख असलेल्या नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला असताना अजित पवार गटाचे नेते कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरत शहा यांची आपल्याबरोबर कसलीही पक्षप्रवेशा संदर्भात चर्चा झाली नसून त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील असे म्हटल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार नेमका काय निर्णय करणार याचीही उत्सुकता आहे.
कोण आहेत भरत शहा...
- इंदापूर शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणातील शहा कुटुंब हे एक दिग्गज घराणं आहे.
- गेल्या तीन पिढ्यांपासून हे घराणं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत राहिले.
- मात्र मागील दोन तीन वर्षापासून हर्षवर्धन पाटील आणि शहा यांच्या कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
- इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा या भरत शहा यांच्या थोरल्या भावजयी आहेत.
- इंदापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद भरत शहा यांनी भूषवले आहे.
- कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते सध्या उपाध्यक्ष आहेत.
- इंदापूर अर्बन बँकेचे अनेक वर्ष अध्यक्ष पद भरत शहा यांनी भूषवले आहे.
- राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात शहा कुटुंबाचा मोठा सक्रिय सहभाग आहे.
- भरत शहा हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले.
- मात्र त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी ही भाजप सोडली आणि तेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले.
- असं असलं तरी पाटील आणि शहा परिवारात असलेला दुरावा कायम आहे.
- जर शहा कुटुंब सोबत आले तर याचा फायदा अजित पवार यांच्या पक्षाला इंदापूर मध्ये होऊ शकतो.
- शहा कुटुंबाचे पवार घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध ही आहेत.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन भरत शहा,शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा,गणेश महाजन,अंगद शहा,प्रमोद राऊत,सुनील तळेकर,प्रशांत उंबरे,निवास माने,बापूराव जामदार,अजिंक्य जावीर,शुभम पवार,गौरव राऊत,प्रवीण हरणावळ,सोनू सय्यद,महेश पाटील,बापू अडसूळ,गोरख ढावरे,उमेश ढावरे,अभिजीत अवघडे,मनोज राजगुरू,पुंडा काका बानकर,बंडा चव्हाण आदित्य बोराटे,शकील सय्यद,संतोष जाधव,अजिंक्य ढाणे,हर्षद सय्यद,ओंकार मोरे,अत्तर मोमीन,अक्षय सूर्यवंशी यांच्यासह शेकडो युवक यावेळी उपस्थित होते.
What's Your Reaction?