इंदापुरात मंत्री भरणे यांच्या उत्साही नृत्याने रंगली बाप्पाची मिरवणूक

Sep 6, 2025 - 20:38
 0  312
इंदापुरात मंत्री भरणे यांच्या उत्साही नृत्याने रंगली बाप्पाची मिरवणूक

आय मिरर 

इंदापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला नेहमीप्रमाणे यंदाही उत्साहाचा, भक्तीचा आणि आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा इंदापूरचे आमदार  दत्तात्रय भरणे यांनी विशेष सहभाग घेतला. 

आपल्या मनमिळावू स्वभावामुळे लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या भरणे यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळाच्या विसर्जन मिरवणूक ठिकाणी ठेका धरत नृत्य सादर केले.

विविध मंडळांच्या गणेश मूर्तींच्या मिरवणुकीत सहभागी होत त्यांनी मंडळांबरोबर पारंपरिक ढोल-ताशा वाद्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी त्यांनी महिलांसोबत भाग घेतला, तर काही मंडळांमध्ये लहान मुलांसोबत नृत्य करून त्यांना प्रोत्साहन दिले. युवकांसोबतही भरणे ठेका धरला. त्यांच्या या उत्साही सहभागामुळे मिरवणुकीत उपस्थित नागरिकांचा उत्साह अधिकच वाढला.

शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी जमली होती. भरणे यांच्या नृत्याचे क्षण मोबाईल कॅमेरात कैद करण्यासाठी नागरिकांनी मोठी धावपळ केली. सोशल मीडियावरही या दृश्यांची चांगलीच चर्चा रंगली.

भरणे यांनी या वेळी नागरिकांना संदेश देताना म्हटले की, “गणेश उत्सव हा समाजाला एकत्र आणणारा, आनंद आणि एकात्मतेचा सण आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकजुटीने समाजकार्यासाठी पुढाकार घ्यावा.”

इंदापूरच्या विसर्जन मिरवणुकीत भरणे यांच्या सहभागामुळे उत्सवात एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. नागरिकांनीही त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाचे स्वागत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow