बारामतीत दादांवर अंकुश ठेवण्यासाठी भाजपचा डाव ; या दोन नेत्यांची नियुक्ती
आय मिरर
बारामतीत नगरपरिषदेच्या निवडणूकीपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीपर्यंत भाजपने आपले सत्तेतले बाहुबल वाढविण्यासाठी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींच्या नियुक्त केल्यात.
यात महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणूकीत दादांना घाईकुतीला आणलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे बारामतीचे प्रभारी व दौंडचे आमदार राहूल कुल यांची बारामतीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
अजित पवारांवर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने हे अस्त्र बाहेर काढले आहे.भलेही राज्याच्या राजकारणात भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी असली तरी बारामतीच्या राजकारणात मात्र या दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे.
नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून बारामतीसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून राहुल कुल तर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप बरोबर सत्तेत सहभागी झालेत. असं असलं तरी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदेंची सेना कुठे युतीत तर कुठे स्वतंत्र लढणार आहेत. सध्या अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे.अशात अजितदादांवर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून या नियुक्त्या करण्यात आल्यात.
बारामती तालुक्यातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून राहुल कुल तर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निगराणी असणार आहे. त्यामुळे दादा भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले असले तरी मात्र भाजपचा जुना स्वभाव पुन्हा एकदा बारामतीला पाहायला मिळणार आहे.
शिंदेंच्या ठाण्यातही प्रभारी नेमला...
भाजपने केवळ पुणे शहर, बारामती आणि मावळ पुरत्या या नियुक्त केल्या नाहीत,तर सत्तेत सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातही भाजपने प्रभारी नेमला आहे. ठाणे शहर साठी निवडणूक प्रमुख म्हणून संजय केळकर तर ठाणे ग्रामीणसाठी कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाण्याकरिता निवडणूक प्रभारी म्हणून गणेश नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच शिंदेंच्या ठाण्यात आणि दादांच्या बालेकिल्ला भाजपने तगडे नेते देऊन कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राजकीय खेळी करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा दौंड शहर अध्यक्ष आपल्या गळाला लावला. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे माजी अध्यक्ष आणि दौंड शहराचे भाजपाचे अध्यक्ष स्वप्निल शहा यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह 17 ऑक्टोबर रोजी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राहुल कुल यांच्यावर टीकाटिपणी केली होती. यामुळे सत्तेत सहभागी असलेले मित्र पक्षातील दौंडचे आमदार राहुल कुल दुखावले होते.त्यानंतर दुखावलेल्या राहूल कुल यांच्या माध्यमातूनच भाजपा आता अजित पवारांवर नथीतून तीर मारण्याच्या तयारीत आहे.
राहूल कुल यांना ताकद देत बारामती मधील नाराजांना भाजपमध्ये घेण्यासाठीच या दोन्ही नेत्यांची भाजपने निवड केली आहे असाही कयास बांधला जातोय. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने अगोदर अजित पवारांना विरोध करणारे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सध्या मौन धारण केलंय. त्यामुळे संघटनेत एक प्रकारची मरगळ आली आहे आणि ही मरगळ झटकण्यासाठी भाजपाने हा डाव टाकला असावा बारामतीत सध्यातरी दादांचाच शब्द प्रमाण मनाला जातो.परंतु उद्याच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी राष्ट्रवादी मधील काही नाराजांना चुचकारून आपल्या गळाला लावत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपची ही रणनीती असू शकते.
What's Your Reaction?