निमगावकेतकी शेळगाव गटात दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना ! नेत्यांची होणार दमछाट ; मानेंच्या भूमिकेकडे लक्ष...
आय मिरर
इंदापूर तालुक्यात पूर्वीच्या रचनेत निमगाव केतकी निमसाखर असा जिल्हा परिषद गट होता. यावेळी मात्र नवीन रचनेनुसार तो निमगाव केतकी-शेळगाव असा झाला. याठिकाणी जिल्हा परिषद गटाकरिता सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. निमगाव केतकी पंचायत समिती गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग तर शेळगाव पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झालेले आहे.
माळी समाजाचा मतदारसंघ म्हणून तालुक्यात ओळख...
आजपर्यंतची राजकीय परिस्थिती पाहता या गटावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सत्ता कायम होती. विशेष म्हणजे या गटाची तालुक्यात माळी समाजाचा मतदार संघ म्हणून विशेष ओळख आहे. या गटात जो नेतृत्व करेल तो माळी समाजाचा नेता असं गणित या ठिकाणचं आहे.
नवीन रचनेनुसार मात्र आता भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांचे रुई गाव या जिल्हा परिषद गटात समाविष्ट झाले आहे. या गटात मराठा माळी आणि धनगर मताधिक्याचे बलाबल आहे. त्यामुळे तिन्ही समाजाचे जातीय समीकरण घालताना वरिष्ठ नेत्यांची दमछाट होणार हे नक्की.
दुसरीकडे 2024 च्या पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माळी समाजाचे अनेक नेते हर्षवर्धन पाटील यांना सोडून दत्तात्रय भरणे यांच्या गोठात गेले. त्यामुळे या जिल्हा परिषद गटात हर्षवर्धन पाटील यांना या गटावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
मानेंच्या भूमिकेकडे लक्ष...
इंदापूर तालुक्यात जरी दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध प्रमुख लढत होत असली तरी निमगाव केतकी शेळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांचे रुई गाव असल्याने उद्याच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या गटामध्ये प्रवीण माने यांच्या भूमिकेकडे ही तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
2012 साली सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने हे निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी दशरथ माने आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराज जाधव यांच्या प्रमुख लढत झाली होती. यावेळी माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता माने यांचे रुई गाव याच जिल्हा परिषद गटात आहे. त्यामुळे दशरथ माने यांच्या सूनबाई मयुरी माने यांच्या नावाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे या गटात जाधव यांच्या सुनबाई सोनाली तुषार जाधव आणि माने यांच्या सूनबाई मयुरी प्रवीण माने यांच्यात सामना रंगेल अशाही चर्चा पारा पारावर होत आहेत.
हे चेहरे प्रमुख दावेदार...
प्रामुख्याने जिल्हा परिषद गटासाठी भाजपाचे युवा नेते विधानसभा निवडणूक लढविलेले प्रवीण माने यांच्या पत्नी मयुरी माने यांच्या नावाची या गटात अधिकची चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव या देखील मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
यासोबतच निमगाव केतकीचे विद्यमान सरपंच प्रवीण डोंगरे यांच्या पत्नी अमृता प्रवीण डोंगरे,विद्यमान माजी सदस्य भारती दुधाळ, वृषाली संदीप भोंग, तसेच निरा भीमा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष लालासाहेब पवार, छत्रपतीचे माजी संचालक अॅड. लक्ष्मण शिंगाडे, कर्मयोगीचे माजी संचालक राहुल जाधव, बापूराव दुधाळ, अभिजित रणवरे, श्री केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग, वैभव जाधव, भजनदास पवार, माणिक भोंग, भाजपचे तालुकाध्यक्ष राजकुमार जठार, माऊली चवरे, शिवसेनेचे अॅड. नितीन कदम, अशा अनेक इच्छुकांचा समावेश आहे.
कोण मारणार बाजी याची चर्चा...
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बावडा जिल्हा परिषद गटानंतर अनेक वर्षापासून या गटावर एक हाती राहिली. मात्र 2024 च्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी माळी समाजाच्या अनेक नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी उभा राहिले. याच दरम्यान पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेला माने परिवार नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात होता. माने यांनी जवळपास 40 हजार मताधिक्याचा आकडाही गाठला. त्यानंतर माने यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपचे कमळ हाती घेतलं. त्यामुळे निमगाव केतकी शेळगाव या जिल्हा परिषद गटात मोठी रंगत आली असून या गटात कोणाचा उमेदवार बाजी मारणार याचीही चर्चा आता पारा पारावर रंगू लागली आहे.
जिल्हा परिषद गटात या गावांचा समावेश...
निमगाव केतकी शेळगाव या जिल्हा परिषदा गटामध्ये एकूण बारा गावांचा समावेश होतो. यामध्ये दोन पंचायत समिती गणांची विभागणी होते. निमगाव केतकी पंचायत समिती गणात व्याहाळी, कचरवाडी, गोतोंडी, हगारवाडी ही गावे येतात. तर शेळगाव पंचायत समिती गणात कडबनवाडी, रुई, मराडवाडी, थोरातवाडी, शिरसटवाडी आणि निमसाखर यांचा समावेश होतो.
What's Your Reaction?