इंदापुरात पळसदेव झेडपीसाठी राष्ट्रवादीकडून हर्षदा जाधवांना संधी ? मंत्री भरणेंकडून तयारीला लागण्याचे आदेश,गलांडवाडीत पार पडली बैठक
आय मिरर
पुण्याच्या इंदापूरात नगरपरिषद निवडणुकीच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषदेची तयारी सुरू झाली आहे.पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दीपक जाधव यांच्या पत्नी हर्षदा जाधव यांना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे निश्चित झाले असून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दीपक जाधव यांना तयारीला लागा असे आदेश दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
या आदेशानंतर जाधव यांच्या गलांडवाडी नंबर एक मध्ये जाधव परिवाराने कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली असून ग्रामस्थांशी चर्चा केली आहे.या बैठकीत ग्रामस्थांनी ही निवडणूक लढवण्यास एकमुखाने समर्थनही दर्शवले आहे.
पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला साठी आरक्षित झाला असून हर्षदा जाधव यांच्या या उमेदवारीमुळे राज्यातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी कडून पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटाकरिता कोणाला उमेदवारी दिली जाते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पाठीमागील निवडणुकीत या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे फायर नेते दीपक जाधव आणि सध्याचे भाजपचे नेते प्रवीण माने यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत माने यांनी जाधव यांना पराभूत केले होते. या गटात पुन्हा जाधव विरुद्ध माने लढत पाहायला मिळणार का ? तर अशीच ही निवडणूक झाली तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल यात शंका नाही.
इंदापूर नगर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने आणि ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी केली होती. मात्र या आघाडीला नगरपरिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यानंतर आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या आघाडी बाबत शंका आहे.
नगरपरिषद निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांचा भारतीय जनता पार्टीतील प्रवेश निश्चित मानला जात असल्याने इंदापुरात भारतीय जनता पार्टीला गारटकर यांच्या माध्यमातून मोठी ताकद मिळेल.गारटकर भाजपसोबत आल्यास माजी आमदार यशवंत माने, भाजपचे नेते प्रवीण माने, माजी सभापती मयूर पाटील आणि प्रदीप गारटकर चौघे नेते इंदापूर तालुक्यातील झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवतील असाही कयास बांधला जातोय. असे झाल्यास इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी हा सामना पाहायला मिळू शकतो.
दुसरीकडे या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची ही भूमिका महत्त्वाची असणार आहे. जर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढणार की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादीने राबवलेला पॅटर्न इंदापुरात ही राबवला जाणार असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र इंदापूर तालुक्यात हे तीन बलाढ्य पक्ष एकमेकांच्या समोर मैदानात असतील. त्यामुळे पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात भाजपचा उमेदवार कोण ? आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडून कोणाला संधी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भाजपा मधून राष्ट्रवादीत प्रवेश...
दीपक जाधव यांनी 3 एप्रिल 2022 रोजी भाजपा मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. 2024 च्या विधानसभा निवडणूक मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवडून आणण्यात त्यांचा सहभाग होता.युवा चेहरा म्हणून इंदापूरच्या राजकारणात जाधव यांचा नवलौखिक आहे.अल्पावधीत युवकांचे मोठ संघटन ही जाधव कुटुंबाची जमेची बाजू आहे.
कोण आहेत दीपक जाधव ?
वयाच्या अठराव्या वर्षापासून गलांडवाडी नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायतवर वर्चस्व.
2006 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष
2011 साली इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा
2017 पुणे जिल्हा परिषदेसाठी प्रवीण माने यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला.
2019 साली काँग्रेस मधून हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश.
3 एप्रिल 2022 साली भाजपा मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
युवा चेहरा म्हणून इंदापूरच्या राजकारणात नवलौखिक.
अल्पावधीत युवकांचे मोठ संघटन
What's Your Reaction?