नाना पाटेकर यांच्याविरोधात खडकवासलामधून लढणार का? चाकणकर म्हणाल्या

Jan 2, 2024 - 11:27
 0  581
नाना पाटेकर यांच्याविरोधात खडकवासलामधून लढणार का? चाकणकर म्हणाल्या

आय मिरर

खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी रुपाली चाकणकर इच्छूक आहेत, असे संकेत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. मात्र त्या जागेसाठी नाना पाटेकर इच्छूक असल्याची चर्चा होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता चाकणकर म्हणाल्या, “निवडणूक ही एकप्रकारची स्पर्धाच आहे.

ज्यांना ज्यांना इच्छा आहे, ते उभे राहतात, आपले नशीब अजमावतात. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलाच पाहीजे, त्याशिवाय निवडणुका लढण्यात मजा नाही. त्यामुळे मीच निवडणूक लढविणार असे होणार नाही. प्रतिस्पर्धी असले पाहीजेत.”

नाना पाटेकर यांच्या विरोधात तुल्यबळ लढत होईल का? असाही प्रश्न विचारला असता चाकणकर म्हणाल्या, “आजवर अनेक अभिनेते राजकारणात आले. त्यांना लोकांनी किती स्वीकारले किंवा नाही स्वीकारले, हे सर्वांना माहितच नाही. त्यामुळे पुढे पाहू काय होते.”

नाना पाटकेर यांच्या उमेदवारीबाबतचा प्रश्न काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांनाही अमरावती येथे पत्रकारांनी विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, “खडकवासला मतदारसंघ माझ्या घराजवळ आहे. नाना पाटेकर माझे मित्र आहेत. त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे का? हे मी अजिबात ऐकलेले नाही.”

मात्र नाना पाटेकर यांनी स्वतःहून जाहीरपणे खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत अद्याप भाष्य केलेले नाही. सिंहगड येथे नाना पाटेकर यांचे फार्महाऊस आहे. त्यामुळे ते बराच काळ खडकवासला मतदारसंघात मुक्कामी असतात. त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचे नाव जोडण्यात आल्याचे कळते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow