बिग ब्रेकिंग | केडगाव गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण ; अवैद्य गर्भपात प्रकरणी या महिला डॉक्टरला अटक

Jun 17, 2026 - 22:13
Jun 17, 2026 - 22:21
 0  123
बिग ब्रेकिंग | केडगाव गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण ; अवैद्य गर्भपात प्रकरणी या महिला डॉक्टरला अटक

आय मिरर 

दौंड तालुक्यातील केडगाव मधील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणात आता आणखी एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉक्टर संगीता पांडुरंग गायकवाड असं या महिला डॉक्टरचे नाव असून गायकवाड या त्यांच्या केडगाव येथील पार्थ हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर त्या महिलांचा गर्भपात करत होत्या हे तपासात पुढे आलं आहे. गायकवाड यांना न्यायालयाने 19 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

केडगाव मधील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एस आय टी ला डॉक्टर संगीता गायकवाड या त्यांच्या पार्थ हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे महिलांचा गर्भपात करत होत्या याचे ठोस पुरावे सापडले आणि त्यानंतर आज बुधवारी 17 जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास यवत पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई केली आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव येथे पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीने गर्भलिंगनिदान चाचणी केल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला 20 मे 2026 रोजी बेड्या ठोकल्या.

पुढे या प्रकरणात खोलवर तपास केला असता अण्णासाहेब गिरी बेकायदेशीरपणे महिलांची गर्भलिंगनिदान चाचणी करायचा आणि गर्भामध्ये स्त्री जातीचा गर्भ म्हणजे मुलगी असल्याची माहिती मिळताच तो गर्भपात करण्यासाठी डॉक्टर संगीता गायकवाड यांच्याकडे पाठवायचा हे तपासात स्पष्ट झालं आहे.

काय आहे प्रकरण....

दौंड तालुक्यातील केडगाव येथे 35 ते 50 हजार रुपयात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंगनिदान चाचणी केली जात असल्याचा एक व्हिडिओ मे 2026 मध्ये सोशल माध्यमात व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने तात्काळ कारवाई करत 20 मे 2026 रोजी याप्रकरणी अण्णासाहेब गिरी याला बेड्या ठोकल्या होत्या.

दरम्यान याचा खोलवर तपास केल्यानंतर पोलिसांनी पुण्यातील वाघोली येथून डॉ.अतुल जाधव याला तत्काळ अटक केली.पुढे या प्रकरणाचा यवत पोलिसांकडून तपासात बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवणारा आरोपी नरेंद्र ठाकरे याच्यासह उरुळी कांचन येथील डॉ. सुंदरम कदम आणि भोर तालुक्यातील डॉ.मंदार माळी यांची नावे समोर आली.हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर नरेंद्र ठाकरे सध्या एका गुन्ह्यात तो जेलमध्ये आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, आर्थिक गणेशाचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र मायने,उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि विशेष तपास पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow