दौंड मध्ये एकाच रात्रीत चार ठिकाणी दरोडा ; दौंड पोलीस अन् स्थानिक गुन्हे शाखेनं पकडली टोळी
आय मिरर
पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत चार ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या सराईत आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टोळीकडून वीस गंभीर पुणे उघडकीस आले आहेत.
या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. १) गणेश मंगेश काळे, वय २२ वर्षे, रा. कुळधरण ता. कर्जत जि. अहिल्यानगर, २) विशाल हंबरडया काळे, वय २१ वर्षे, रा. चिखली ता. आष्टी जि.बीड, ३) किशोर रावण भोसले वय १९ वर्षे रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 जून 2026 च्या रात्री चार वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा पडल्याच्या घटना घडल्या होत्या. यासोबत श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील याच रात्री एका ठिकाणी दरोडा पडला होता.
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोरवडी, बाबीरनगर, आवदेवस्ती, आवाळेवस्ती अशा ठिकाणी रात्री एकच्या सुमारास अनोळखी सहा ते सात दरोडेखोरांनी शिवीगाळ, दमदाटी करत हत्याराने माराहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल असा एकूण सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने या गंभीर दरोड्याची दखल घेत तात्काळ तपास सुरू केला.गोपनीय बातमीदाराकडून पुरवण्यात आलेली माहिती,घटनास्थळापासून सुमारे ५० किमी पर्यंत रस्त्यालगत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणेत आले, फुटेज मधील उपलब्ध माहितीचे आधारे खात्री झाली की, सदरचे आरोपी हे अहिल्यानगर जिल्हयातून गुन्हा करणेसाठी आले व पुन्हा अहिल्यानगर जिल्हयाकडे गेले आहेत.
सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी १) गणेश मंगेश काळे रा. कुळधरण ता. कर्जत जि. अहिल्यानगर, २) विशाल हंबरडया काळे रा. चिखली ता. आष्टी जि.बीड, ३) किशोर रावण भोसले रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ४) प्रविण ऊर्फ पप्पु लाला भोसले व त्यांचे इतर साथीदार यांच्या मदतीने केला असल्याची पोलिसांची खात्री झाली.
सदरचे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी सशस्त्र दरोडा, जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदरील आरोपी घरी न राहता, शेतात, माळावर, विटभट्टीवर वेषांतर करून राहतात अशी पोलिसांना माहिती मिळाली. त्या अनुषंगाने दि. १३ जून २०२६ रोजी संपूर्ण रात्रभर वेगवेगळी तपास पथके तयार करून बाभुळगाव खालसा ता. कर्जत जि. अहिल्यानगर व चिखली ता. आष्टी जि. बीड या ठिकाणी एकाच वेळी पथकांमार्फत कारवाई करून यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी दौंड तालुक्यात एकाच रात्री चार ठिकाणी आणि श्रीगोंदा तालुक्यात एका ठिकाणी दरोडा यासह वेगवेगळे 20 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी गणेश काळे याचेवर यापुर्वी दरोडा व चोरीचे ०८ गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी विशाल काळे याचेवर यापुर्वी ०२ गंभीर गुन्हे, आरोपी किशोर भोसले याचेवर यापुर्वी ०१ गुन्हा दाखल असून आरोपी प्रविण भोसले याचेवर ११ गंभीर गुन्हे दाखल असून तो बऱ्याच गुन्हयांमध्ये फरार आहे.
सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पो स्टे. चे पो. नि. हेमंत शेडगे, माळेगाव पो.स्टे. चे सपोनि कुलदीप संकपाळ, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, स्था.गु. शाखेचे पोलीस अंमलदार, शिवाजी निकम, असिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे, राजू मोमीण, गणेश धनवे, संतोष भापकर, सुभाष राउत, गुरूनाथ गायकवाड, विकास कापरे, सुलतान डांगे, रईस मुलाणी, तुषार चव्हाण, गणेश डेरे, धिरज जाधव, तुषार भोईटे, स्वप्निल अहीवळे, अजय घुले, गणेश होळकर, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, मपोहवा सुजाता कदम, भाउसाहेब पुंड, अजय देडे, दौंड पोलीस स्टेशनचे पो.स.ई. अब्दुल बिद्री, पोसई रुपेश कदम, पोलीस अंमलदार नितीन बोराडे, धनंजय गाढवे, पवन माने, गोरख हजारे, सागर म्हेत्रे, रमेश चितारे, संतोष भोसले, सचिन साप्ते, ओमराज कुमकुटे, महेंद्र लोहार, सोमनाथ चौंडे, किरण पांढरे, संजय कोठावळे, महिला पोलीस अंमलदार वैशाली बनसोडे, काजल शिंदे, ऊरूळीकांचन पो. स्टे. चे सचिन जगताप, प्रविण चौधर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?