सपकळवाडीनं जिल्ह्यात नांव कमावलं,आमदार भरणेंनी दिली शाबासकीची थाप ! वाचा सविस्तर 

Dec 11, 2023 - 15:35
 0  463
सपकळवाडीनं जिल्ह्यात नांव कमावलं,आमदार भरणेंनी दिली शाबासकीची थाप ! वाचा सविस्तर 

आय मिरर

गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावाने पुणे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावत सन 2019 - 20 सालचा पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मिळविला आहे.या निमित्ताने नुकतेच आमदार दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते पुरस्कार व पाच लक्ष रूपयांचे बक्षिस सपकळवाडी ग्रामस्थांकडे सुपुर्द करण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सपकळ,सरपंच रोहिणी तानाजी सोनवणे,माजी सरपंच शिवाजी सपकळ,शिवाजी बापु सपकळ,अनिल सपकळ,सुदर्शना भुजबळ,जमादार सपकळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,युवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांचे कौतुक करताना सांगितले की,खऱ्या अर्थाने गावकऱ्यांची एकजुट व सामुहिक प्रयत्नामुळे सपकळवाडी गाव जिल्ह्यात प्रथम आले असून या छोट्याशा गावाने आपापले घर,दार,अंगण तसेच परिसर स्वच्छ व सुंदर ठेवत संपुर्ण गावाला आदर्शवत बनवले. आपण सपकळवाडी गावात विकासाच्या बाबतीत कोट्यावधी रूपयांचा निधी दिला असल्याने विकासकामात हे गाव तर अग्रेसर आहेच,परंतु शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्यासाठी सरपंच रोहिणी सोनवणे,उपसरपंच सचिन सपकळ तसेच इतर सर्व कार्यकर्ते तळमळीने प्रयत्न करत असतात.

या गावाला व वाड्यावस्त्यांना जोडणारे मुख्य रस्ते पुर्णत्वास गेले आहेत.तसेच गावांतर्गत असणाऱ्या सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे,या ठिकाणी जलसंधारण,ओढा खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने पाण्याची नैसर्गिक उपलब्धता आहे‌.त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची २४ तास सोय,प्राथमिक शाळा,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदींची सुविधा अतिशय उत्तम असल्यामुळे सपकळवाडी गाव खऱ्या अर्थाने बाकी खेड्यांसाठी एक विकास मॉडेल ठरले असल्याचे गौरवोद्गार आमदार भरणे यांनी काढत ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. यापुढेही सपकळवाडीला निधीची कमतरता भासू देणार नाही,हा विश्वासही आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.

या स्पर्धेत भोर तालुक्यातील ससेवाडी गावाने दुसरा क्रमांक व शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी गावाने तिसरा क्रमांक पटकावला आहे‌.एकूणच सचिन सपकळ यांच्या नेतृत्वाखाली सपकळवाडी सारखे छोटेसे गाव आज खऱ्या अर्थाने नावारूपाला आले असून शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ गावातील शेवटच्या माणसाला मिळवून देण्यासाठी श्री.सपकळ हे तळमळीने मेहनत घेत आसतात.तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ते तालुक्यात मिळेल ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाचे नेहमीच तालुकाभर कौतुक होत असते.आता त्यांनी पुढाकार घेत आपल्या गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवून दिले आहे.

सामुदायिक प्रयत्नामुळे सपकळवाडी गाव प्रथम - सचिन सपकळ 

गेल्या दहा वर्षापासून सपकळवाडी गावामध्ये आमुलाग्र बदल झाला असून मी सरपंच असताना आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळवून दिला आहे.तसेच प्रत्येक योजना गावामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.सोबतच गावच्या विकासासाठी आमदार भरणे लागेल तेवढा निधी मंजूर करत असतात.त्यामुळे आमच्या गावाला सर्वच बाबतीत सौंदर्य प्राप्त झाले आहे.म्हणून या स्पर्धेचे सर्व निकष पार करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत आम्ही प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय हा पुरस्कार मिळविण्यामध्ये सर्व ग्रामस्थांचे तर योगदान आहेच.परंतु यामध्ये खास करून आमदार भरणे यांचे विशेष मार्गदर्शन व त्यांच्या माध्यमातून भरभरून निधी मिळाल्यानेच आम्हाला हा पुरस्कार मिळाला असल्याची माहिती देत सचिन सपकळ यांनी सपकळवाडी करांच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow