दहशत माजवणाऱ्यावर एमपीडीएचा दणका ; शिक्रापूर पोलिसांकडून धोकादायक व्यक्ती म्हणून थेट कारागृहात रवानगी

Aug 24, 2026 - 20:42
Aug 24, 2026 - 20:43
 0  68
दहशत माजवणाऱ्यावर एमपीडीएचा दणका ; शिक्रापूर पोलिसांकडून धोकादायक व्यक्ती म्हणून थेट कारागृहात रवानगी

आय मिरर 

औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या शिक्रापूर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी आता कडक पावले उचलली आहेत. परिसरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सुरज उर्फ मोन्या संजय देडगे वय २७ रा.चाकण रोड,शिक्रापूर याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानंतर देडगे याला ताब्यात घेऊन अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्याने या परिसरात आर्थिक व्यवहार आणि वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दहशत निर्माण करून गैरमार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचे प्रकार घडत असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी दिले होते. 

त्यानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हद्दीतील गुन्हेगारांचा अभिलेख तपासून वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित केली. त्यामध्ये सुरज उर्फ मोन्या देडगे याच्याविरुद्ध चंदननगर, शिरूर, नारायणगाव आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर दुखापत, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शिवीगाळ व दमदाटीसह दुखापत अशा स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. 

वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या देडगे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. 

हा प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि पोलिस अंमलदार महेश बनकर आणि शिक्रापूरचे रोहिदास पारखे यांनी चांगला पाठपुरावा केला. प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सुरज उर्फ मोन्या देडगे याला 'धोकादायक व्यक्ती' या प्रवर्गात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. 

आदेश प्राप्त होताच शिक्रापूर पोलिसांनी देडगे याला २ दिवस शोधून ताब्यात घेतले. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार, तसेच रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, पोलीस अंमलदार नारायण वाळके, शिक्रापुर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केलेली आहे.

'शिक्रापूर व रांजणगाव परिसरातील एमआयडीसी क्षेत्रात दहशत, दादागिरी किंवा गुंडगिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.उद्योजक,कामगार,व्यावसायिक किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन दबाव निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. याबाबत माहिती मिळताच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत पोलीस सतर्क आहेत. - संदिपसिंह गिल्ल,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow