'भाजपनं घर फोडलं,आईसमान मोठ्या वहिनीला विरोधात उभा केलं' - सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
आय मिरर
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील लक्षवेधक लढत बारामतीमध्ये रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना, तर शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रिया सुळे यांना बारामतीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
शनिवारी अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. यावर सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून भारतीय जनता पक्षावर तिखट हल्ला चढवला.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे नेते बारामतीमध्ये येऊन म्हणतात की या निवडणुकीमध्ये आम्हाला शरद पवार यांना हरवायचे आहे. याचाच अर्थ त्यांना विकासाशी काही देणेघेणे नाही. त्यांच्याकडे कोणताही उमेदवारही नव्हता. आमचे घर फोडले आणि घरातील महिलेलाच उमेदवारी द्यावी लागली. माझ्यावर झालेल्या संस्कारानुसार मोठ्या भावाची बायको आईसमान असते. आमच्या आईलाच भाजपने विरोधात निवडणुकीत उतरवले आहे. याचाही जनता नक्कीच विचार करेन, असेही त्या म्हणाल्या.
भाजपची चाल यशस्वी ठरली
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एक ट्विट केले आहे. पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं. दुर्दैवाने आज भाजपची चाल यशस्वी ठरली असली तरी बारामतीची जनता स्वाभिमानी आहे, असे रोहित पवारांनी म्हटले.
What's Your Reaction?