नवी मुंबई || ऐरोली सेक्टर ३ मध्ये आज संध्यकाळी ६.३० वाजता भगवान पाटील या व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार केला. भगवान पाटील हा निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. यामध्ये एका मुलाला २ गोळ्या लागल्या, तर एका मुलाच्या कंबरेला गोळी चाटून गेली असून यातील एका मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हा) उमेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार आणि रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन भगवान पाटील याला अटक केली.

ऐरोली सेक्टर ३ येथील भोस्कर भवन शेजारी राहत असलेला निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांने आपल्या राहत्या घरी त्याच्या २ मुलांवर रिव्हॉल्वरच्या सहाय्याने ३ वेळा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज ऐरोलीमध्ये घडली. गोळी झाडणारा भगवान पाटील (वय ७०) हा नवी मुंबईतील निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. घरातील कौटुंबिक वादामध्ये ही घटना घडली असल्याचे समजते.
पाटील याचा मुलगा सुजय हा वसईमध्ये वास्तव्यास आहे, तर दुसरा मुलगा विजय हा ऐरोलीमध्येच राहतो. भगवान पाटील याने कॉल करून सुजयला बोलावून घेतले व घरातील आपापसातील भांडणांमध्ये पाटील याने त्याच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्याच्या दोन्ही मुलांच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. यामध्ये मुलगा सुजय याला २ गोळ्या लागल्या, तर दुसरा मुलगा विजय याच्या कंबरेला गोळी चाटून गेली. सुजय याला इंद्रावती रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.