मालोजी राजेंच्या श्रद्धास्थानी असलेल्या या दर्ग्याला हिंदू मुस्लिम ऐक्याचे वलय आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती धर्माचे हजारो भाविक उरुसाच्या वेळी दर्ग्याच्या दर्शनाला येतात. उरुसातील बऱ्याच विधींचा मान विविध जाती धर्मातील बांधवांना असून, अरबी, इंग्रजी नव्हे तर हिंदू कालगणनेतील मार्गशीर्ष महिन्याच्या ८-१० तारखेलाच हा उरूस साजरा केला जातो.
इंदापूर : आय मिरर
इंदापूर शहराचे ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेले हजरत चॉंद शाहवली बाबांच्या उरूसाला आज गुरुवार पासून सुरवात झाली आहे.पुढील दोन दिवस हा उत्सव चालणार आहे.ब्रिटीश काळापासून बाबांच्या मजारवर मानाची फुलांची चादर चढवण्याचा मान हा पोलीस प्रशासनाकडे असतो त्या परंपरेनुसार इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी वाजत गाजत ही फुलांची चादर बाबांच्या मजारवर चढवली.
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान, इंदापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे सुवर्ण पान आणि एकूणच इंदापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक हजरत चाँदशाहवली दर्ग्याच्या ४५८ वा उरूस आज गुरुवार १ डिसेंबर पासून साजरा केला जातोय. आज संदलचा कार्यक्रम पार पडणार असून, शुक्रवारी २ डिसेंबर रोजी मुख्य उरूस, तर शनिवारी ३ डिसेंबर रोजी झेंड्याचा ग्राम प्रदक्षिणा कार्यक्रम पार पडणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष उरूस पारंपरिक मात्र अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र कोरोनाचे सावट हटल्याने उरूसोत्सव शासनाच्या निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्ग्याचे विश्वस्त मुनीर मुजावर, तसेच उरूस कमिटीचे अध्यक्ष आझाद पठाण, उपाध्यक्ष महादेव चव्हाण आणि प्रमुख मानकरी हमीद आत्तार यांच्याकडून करण्यात आले आहे.
सध्या दर्गाह परिसरात छोट्या मोठ्या वस्तूंची आणि मिठाईची हजारो दुकाने थाटली आहेत. तर दर्ग्याला विद्युत रोषणाईसह परिसराची रंगरंगोटी आणि स्वच्छ्ता करण्यात आल्याने संपूर्ण दर्गाह परिसर चांगलाच उजळून निघाला आहे.