पुणे || कात्रज येथील नवीन बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर महामार्गालगत मृतदेह टाकून दिला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला, दरम्यान, या मुलाच्या आईचाही खून करुन मृतदेह सासवडजवळ टाकल्याची माहिती पुढे आली आहे.

आयान शेख ,वय ६ वर्षे रा. धानोरी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या मराठेशाही हॉटेलच्या परिसरात एका मुलाचा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संबंधीत मुलाचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी मुलाचे काही नातेवाईक त्याचा शोध घेत तेथे आले होते. त्यामुळे मुलाची ओळख पटविता आली. त्याचा खून कोणी व का केला हे स्पष्ट अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, त्या मुलाचा खून करून त्या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करत आहेत.
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील खळद येथे सासवड ते जेजुरी दरम्यानच्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या हॉटेल सूर्याच्यासमोर एका ३५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सासवड पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. या महिलेच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत महिलेचं नाव आलिया शेख असून ही आयान शेख याची आई असल्याची माहिती पुढे आली आहे. आलिया आणि आयान यांचा धानोरी येथे खून करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पण हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे अद्याप समोर आलेलं नाही, पोलीस याचा तपास करीत आहेत. दरम्यान, मृत चिमुकल्याचे वडील बेपत्ता असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.