बारामती || उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभुमिवर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेक वाढ करण्यात आली आहे.
उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. पण, सोलापूरमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. पोलिसांनी आधीच कारवाई करत तीन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

लेखी अध्यादेशाची सोलापूरकरांची मागणी
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.