इंदापूर : आय मिरर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. मोदी यांनी गांधीनगरमध्ये हीराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला. गांधीनगर येथील स्मशानभूमीत मुखाग्नी देत अंत्यसंस्कार केले. हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.
गुरुवारी मध्यरात्री अचानक हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान हीराबने यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. दत्तात्रय भरणे आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. मा. नरेंद्र मोदीजी यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो, हीच प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली.असं ट्विट माजी मंत्री आ.दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून दुःख झाले. मोदीजींना मातृछत्र १०० वर्षं लाभलं. हिराबेन यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आम्ही सर्व नरेंद्रजी मोदी यांच्या दुःखात सहभागी आहोत.असं ट्विट भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.