आय मिरर
इंदापूर तालुक्यातील कांदलगांव मध्ये मकर संक्रातीच्या निमित्ताने महिलांच हळदी कुंकू पार पडलयं.यावेळी महिलांना मासिक पाळी व महिलांच्या मानवी हक्कांबाबत व्याख्यात्या स्वाती चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं आहे.
कांदलगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने गावातील महिलांना मासिक पाळी आणि महिलांच्या मानवी हक्कांबाबत मार्गदर्शन करण्याकरता मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.म्हणून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासक, स्तंभलेखिका तथा कांदलगावच्या ग्रामविकास अधिकारी स्वाती चव्हाण यांनी महिलांना याबाबतीत सखोल मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती होती. कांदलगाव मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे.
यावेळी व्याख्यात्या चव्हाण यांनी मासिक पाळी,त्यादरम्यान होणारा शारीरीक व मानसिक त्रास,लक्षणे,घ्यावयाची काळजी,मासिक पाळीविषयी असलेल्या अंधश्रद्धा, समज-गैरसमज तसेच महिलांचे मानवी हक्क यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना स्वाती चव्हाण म्हणाल्या की,मासिक पाळी ही शाप न मानता महिलांना लाभलेली दैवी शक्ती आहे,विश्वनिर्मितीचा आधार आहे,मासिक पाळीच्या काळात महिलांना सार्वजनिक ठिकाणी तसेच मंदिरात प्रवेश नाकारणे म्हणजे महिलांच्या मानवी हक्काचे उल्लघंन आहे.सर्व महिलांनी मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काळजी तसेच स्वच्छतेबाबत जागरूक राहिले पाहिजे.नैसर्गिक चक्रात महिलांनी अंधश्रद्धेला बळी पडून हस्तक्षेप करू नये.
यावेळी मुख्याध्यापक आप्पासाहेब जाधव,पल्लवी मोरे,स्वाती देवकाते,आश्विनी बांदल,निंबाळकर गुरूजी,सर्व महिला सदस्य,गावसमन्वयक निलोफर पठाण,व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी शाळेतील लहान मुलींनी वेगवेगळी वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.वाण म्हणून परिवर्तनाची निशाणी पेन वाटण्यात आले.आभार पल्लवी मोरे यांनी मानले.