आय मिरर ( विजयकुमार गायकवाड)
डिकसळ ( ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणारे देवानंद भानुदास शेलार यांना सहकाररत्न उत्तमराव काळे यांच्या नावाने दरवर्षी १७ जानेवारी या दिवशी सहकाररत्न उत्तमराव काळे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा वस्ताद शिवाजी काळे प्रतिष्ठान व सहकाररत्न उत्तमराव काळे फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व बारामती नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर पानसरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती शिवदास सूर्यवंशी यांनी पुनर्वसन गावठाण झाल्यानंतर या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडल्याचे दाखले दिले.तसेच शाळेच्या जडणघडण्याच्या जुन्या आठवणी सांगितल्या. तर प्रमुख पाहुणे व बारामती नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर पानसरे यांनी देवानंद शेलार हे खूप मेहतीने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असून पोट तिडकीने विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत असून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे व जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत याबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येत आहे.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी स्वर्गीय उत्तमराव काळे यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांनी सहकारात केलेल्या प्रामाणिक कामाचे दाखले दिले.
सत्काराला उत्तर देताना देवानंद शेलार यांनी सहकाररत्न उत्तमराव काळे यांच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले तसेच त्यानंतर विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास इंदापूर तालुका शेगर समाजाचे उपाध्यक्ष शितलकुमार हगारे ,मोहनराव काळे ,गुरुदास काळे ,सतीश काळे, विनायक काळे, सुरेश काळे, विष्णू काळे, योगेश काळे आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल काळे यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे सदस्य सतीश काळे यांनी मानले.