आय मिरर : भिगवण ( विजयकुमार गायकवाड)
डिकसळ ( ता.इंदापुर) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी या संस्थेचे सभासद मा.व्हा.चेअरमन सोमनाथ चंद्रकांत भादेकर यांनी केली आहे.याबाबत सोमनाथ भादेकर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ( ग्रामीण) येथे रितसर तक्रार केली आहे.
भादेकर यांच्या तक्रारी अर्जात मौजे डिकसळ( ता. इंदापूर) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सन २०२१ -२२ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नसून रितसर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत आपण संस्थेच्या पंचकमिटीला वारंवार तोंडी मागणी करत असताना देखील पंचकमिटीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक असतात तरीही सभासदांनसमोर चालू वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, ताळेबंद न ठेवता बेकायदेशीरपणे लाभांश वाटप केला आहे.या कारणामुळे महाराष्ट्र सहकारी अधिनियम कायद्यानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सोमनाथ भादेकर यांनी केली आहे.
याबाबत संस्थेचे चेअरमन कैलास कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,सभासदांना लाभांश वाटप करण्याचा विषय मासिक सभेत घेतला होता सर्व संचालकांनी मान्यता दिल्यानंतरच लाभांश वाटप करण्यात आला.तसेच दरम्यानच्या काळात डिकसळ ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने आचारसंहिता लागेल म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास विलंब झाला.
इंदापूर तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर हे काय निर्णय देतात याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.