आय मिरर
इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये लाखेवाडी येथे इंदापूर पोलीसांनी अवैधरित्या बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या अड्डयावर धाड टाकली असून यात पोलीसांनी २ लाख १२ हजार रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच अवैधरित्या मटका चालवणारे ०२ इसमांच्या वरती रेड करून ३ हजार १०० /-रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लाखेवाडी पंचक्रोशीत अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री करणारे जवळपास १२ ते १५ अड्डे कार्यान्वित असून दोन ते तीन जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याने महिला आता आक्रमक झाल्या असून विशेष महिलांच्या ग्रामसभेमध्ये 13 जानेवारी रोजी हे अवैद्य धंदे मोडीत काढण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे.यासोबत तातडीने हे अवैध दारूचे आणि मटक्याचे धंदे बंद करावेत यासाठी ग्रामपंचायतने अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांसह इंदापूर पोलीस आणि इंदापूर महसूल प्रशासन यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यानंतर आता कारवाईला वेग आला असून या निवेदनाची दखल घेत इंदापूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे लाखेवाडी पंचक्रोशीतील अवैद्य धंद्यांचे अड्डे उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवारी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे इंदापूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली असून दोघांविरुध्द भारतीय दंड विधान संहिता कलम ३२८ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर अन्य दोघांविरुध्द महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाखेवाडी येथील दोन इसम उसाच्या शेता मध्ये शरीरास अपायकारक रसायन तयार करून ते बेकायदेशीर पणे विक्री करत आहेत याची टीप पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार रात्री रेड करुन ही कारवाई केली आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,महिला पोलीस हवालदार माधुरी खंडागळे, पोलीस नाईक हेगडे, पोलीस शिपाई दिनेश कांबळे व शिंदे यांच्या पथकाने केली आहे.