मुंबई || शिवसेना भवनासमोर झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात कोविड काळात जमावबंदीचा नियम मोडून मोर्चा काढल्याप्रकरणी भादंवि कलम 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा कलम 51 अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे मारहाण आणि विनयभंग प्रकरणी भादंवि कलम 143, 147, 149, 392, 324, 323, 354,50 अंतर्गत ७ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईतील दादर परिसरातील शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहण्यास मिळाला. अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखाचा निषेध करण्यासाठी भाजपने फटकार मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीत घोटाळा झाल्याचे आरोप आपच्या नेत्यांनी केले. त्यानंतर मंदिर बांधणीबाबत भ्रष्टाचार होत असल्याबद्दल संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून व्यक्त केला. तसेच, अनेक शिवसेना नेत्यांनी याप्रकरणी काही वक्तव्ये केली. या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाबाहेर फटका आंदोलन केले. पण या ठिकाणी आंदोलन करून देणार नाही असं सांगत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेदरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाईट वर्तणूक केली असा आरोप करत भाजपच्या एका महिला कार्यकत्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली.