आय मिरर
बारामती तालुल्यातील सुपे येथून चोरट्यांनी ७ लाख १४ हजार रुपये रोकडसह चोरून आणलेले एटीएम मशीन पहाटेच्या सुमारास रावणगाव-बोरीबेल रस्त्यावरील गटारात टाकून चारचाकी वाहनासह चोरट्यांनी पळ काढला. शुक्रवारी १० मार्च रोजी पहाटे सुपे येथिल इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने तोडून चारचाकी वाहनातून चोरट्यांनी चोरून आणले होते. पहाटेच्या सुमारास बोरीबेल घाटात बोलेरो गाडीतून चोरून आणलेले मशीन चोरटे गटारात लपवण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी बघितले. त्यामुळे हे चोरटे तेथून पळून गेले.ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस येऊन चोरीचा मोठा प्रयत्न फसला गेला.
रावणगाव येथील ग्रामस्थ कुमार चव्हाण, गणेश गावडे, बाळदत्त आटोळे यांनी या बाबतची खबर दौंड पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, गोरख मलगुंडे, भागवत यांनी ते मशीन ताब्यात घेतले. हे मशीन रावणगाव पोलीस चौकी येथे आणले असता हा प्रकार बारामती तालुक्यातील सुपे येथे घडला असल्याचे समजले.
यानंतर घटनास्थळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, वडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी घटनास्थळी पाहणी करून दौंड पोलिसांच्या ताब्यातून एटीएम मशीन ताब्यात घेतले. चोरट्यांनी ते मशीन गॅस कटरने तोडून पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला मात्र मशीन न तुटल्याने त्यातील रक्कम तशीच राहिली. यामधून ५०० रुपयाची एक नोट बाहेर निघालेली होती.