आय मिरर
इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याचा आमदार म्हणून मी सक्षम आहे.मी गप्प बसलो आहे याचा अर्थ मी शांत आहे असे समजू नका. तालुक्यासाठी अनेक विकास कामे आणली आहेत.अशी कामे करायला आमदार लागतो मग तो कोणत्या का पक्षाचा असेना. जनतेने तुम्हाला सक्तीची विश्रांती दिली असून आपण तालुक्याच्या विकासाची चिंता करु नये, त्यासाठी हा मामा खंबीर आहे असा टोला आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.
मी आमदार म्हणून काम करायाला सक्षम आहे.तावशीत माझी सभा झाली होती.मी काय आश्वासन दिले होते याला आख्खा गाव साक्षीदार आहे.विरोधक जे पत्र दाखवत आहेत त्यावर उचित कार्यवाही करा असा शेरा आहे आणि मी जे दाखवतोय त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर कामाचा अर्थसंकल्पात थेट समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप ची विकास कामाची यादी आणि आपण दिलेलं पुलाचे काम यात फक्त पुलाचे काम मंजूर झाले आहे यावरून जनतेने ठरवावे काम कोणाच्या सांगण्यावरून मंजूर झाले असेल. त्यामुळे कोण उल्लू बनवत आहे ते जनतेने ठरवावे. जनता सुज्ञ आहे याचा निवाडा जनतेच्या दरबारात होऊ द्या, असे ही भरणे म्हणाले.
नुकत्याच सादर करण्यात आले राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील तावशी – आसू या गावांना जोडणाऱ्या महत्वाच्या पुलाच्या कामाकरिता १७ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.मात्र हा निधी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून आला की दत्तात्रय भरणेंच्या यावरून दोघांकडून सध्या दावे प्रतिदावे केले जात आहेत.
भाजपा आणि राष्ट्रवादीत यावरून जुंपली असून गुरूवारी ०९ मार्च रोजी सर्वप्रथम आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या प्रयत्नातून हा विकास निधी आल्याचा दावा केला. रात्र उजाडते ना तोच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा निधी आपल्या प्रयत्नामुळे आल्याचा दावा करत आमदार भरणे यांचा दावा खोडून काढला. मात्र याला काही तास होतात ना तोच आमदार भरणे यांनी भाजपावर पलटवार करीत हर्षवर्धन पाटील यांना विश्रांतीचा सल्ला देत विकासाची चिंता तुम्ही करु नका म्हणत तालुक्याच्या विकासासाठी आपण तालुक्याचा आमदार या नात्याने खंबीर असल्याचं सांगितले.