आय मिरर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील युती सरकारने विधिमंडळात सादर केलेला सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व समाजाला व घटकांना न्याय देण्यात आला आहे. विधिमंडळाच्या इतिहासातील उत्कृष्ट असा अर्थसंकल्प आहे, असे गौरवोद्गार भाजपनेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत रविवारी (दि.12) काढले. दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या बैठकीत इंदापूर तालुका भाजपने उत्कृष्ट अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
शिवसेना-भाजप डबल इंजिन सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पातून समाजातील प्रत्येक घटका प्रति असलेली बांधिलकी दिसून येत आहे. राज्यातील जनतेच्या आलेल्या 40 हजार सूचनांचा या अर्थसंकल्पात विचार करून, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कल्पकतेने अर्थसंकल्प मांडल्याचे या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
नमो शेतकरी महासन्मान निधी जाहीर
नमो शेतकरी महासन्मान निधी जाहीर करून केंद्र सरकारच्या प्रतीवर्षी-प्रतिशेतकरी 6 हजार रुपयांत, राज्य सरकार आणखी 6 हजार रुपये भर घालणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून सहभाग घेता येणार आहे. तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व शिवभजन थाळी योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
धनगर समाजासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना
धनगर समाजासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून शेळी-मेंढी पालना करीता 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शेळी व मेंढी सहकारी विकास महामंडळाची स्थापना करून मुख्यालय अहमदनगर येथे असणार आहे.तसेच धनगर समाजाच्या उन्नतीकरीता आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर 22 योजनेसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
मागेल त्याला शेततळे
मागेल त्याला शेततळे योजनेनुसार आता मागेल त्यास फळबाग, ठिबक सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह दिले जाईल. तसेच जलशिवार योजना- 2 ची घोषणा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. मोदी आवास घरकुल योजनेतून इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात 10 लाख घरे त्यासाठी 12 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत
महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ, महात्मा फुले जन आरोग्य योजना उपचाराची मर्यादा रु.1.5 लाख वरून 5 लाख करणे, हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यात 700 दवाखाने सुरू करणे आदी लोकहिताचे निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत.
लिंगायत समाजासाठी विकास महामंडळांची स्थापना
लिंगायत समाजासाठी-महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी- संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी- राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी-पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजातील सर्व घटकांना अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आहे.
ते पुढे म्हणाले, पुणे रिंग रोडचे भूसंपादन, मुंबई पुणे दृतगती मार्गावर खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकचे बांधकाम करणे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एशियन डेव्हलपमेंट बँक, हायब्रीड अँन्युईटी व इतर नियमित योजनातून 18 हजार कि.मी. लांबीचे रस्ते सुधारणा आणि 4 हजार 500 कि.मी. लांबीचे जिल्हा व ग्रामीण मार्गाची कामे तसेच मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद शेत रस्ते योजनेत सुधारणा करून नवीन योजना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मराठा समाजासाठीच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ) या संस्थेचे नाशिक येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्याचा व तेथे अभ्यासिका आणि मुला-मुलींच्या वसतीगृहासाठी 50 कोटीची केलेली तरतूद व इतर समाजासाठींच्या बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या निधीत वाढ करून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
20 हजार ग्रामपंचायतीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यास 350 कोटी रुपये, गडकोट किल्ले संवर्धनासाठी 300 कोटी रुपये, कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार यांच्यासाठी श्री संत नामदेव महाराज किर्तनकार सन्मान योजना सुरु करणे आदी महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
लाकडी-लिंबोडी योजनेसाठी 450 कोटीची तरतूद
लाकडी-लिंबोडी योजनेसाठी 450 कोटीची तरतूद, इंदापूर तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी 55 कोटी रुपये रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तावशी पुलासाठी 17 कोटींचा निधी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारने दिल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील हरघर हरजल योजनेसाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी आल्याची माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी दिली. यावेळी भाजपचे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.