आय मिरर
इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून बॅनरबाजी करण्यात आलीय. या बॅनर वरती भाजप नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो टाकण्यात आला आहे.या फोटो मुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. इंदापूर शहरातील विकास कामांसाठी नगरोत्थान योजना व दलित वस्ती योजनेतून 15 कोटी 46 लाख 99 हजार रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांचा फोटो टाकून चौकात चौकात बॅनर लावत जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
या बॅनर वरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांसह माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे देखील फोटो आहेत.
इंदापूर शहरात आणलेल्या विकास निधीवरुन राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असून आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेस एक पाउल पुढे टाकत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभाराचे बॅनर लावण्याने याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.