इंदापूर : आय मिरर
इंदापुरात शाळेत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा बुधवारी ०४ जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला आहे.रात्री उशिरा नातेवाईकांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे प्रणव नानासाहेब करे वय २० वर्षे ( राहणार करेवाडी तालुका इंदापूर)असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून राजकुमार पवार इरफान शेख (दोघे राहणार इंदापूर) व फरदीन मुलाणी रा. वडापुरी ता. इंदापूर या तिघांविरोधात मयतचा भाऊ प्रतिक नानासाहेब करे यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र तिघा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आग्रही भूमिका नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत घेतली व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर ०५ जानेवारी पोलिसांनी तात्काळ तपास करून तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,०२ जानेवारी रोजी इरफान शेख,फरदीन मुलाणी आणि अमोल चव्हाण(आढेगाव ता. माढा)यांनी प्रणवला इंदापूर शहरात येऊ नको अशी धमकी दिली होती. तू इंदापूरला आलास तर तुला कायमचा संपवु रिव्हालव्हरच्या गोळ्या घालून ठार मारू असं धमकावण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी 3 जानेवारी रोजी फिर्यादी प्रतिकने या तिघांनाही भेटून शिवीगाळ का करता का धमकावता असं विचारले होते.
बुधवारी ०४ जानेवारीला प्रणव चा इंदापूर जवळील सातपुते वस्ती येथे अपघात झाल्याचा प्रतिकला निरोप आला.तात्काळ तो घटनास्थळी गेला असता तिथे राजकुमार पवार व त्याचे मित्र होते.प्रणवची दुचाकीची तिथे पडलेली दिसली.तर प्रणवला उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे नेल्याचे सांगण्यात आले.डाॅक्टरांनी तपासणी अंती प्रणवला मयत घोषीत केले.यावरून राजकुमार पवार, फरदीन मुलाणी,इरफान शेख यांनी जुन्या भांडणाच्या कारणातून कशानेतरी माझ्या भावास जीवे मारले आहे.अशी फिर्याद दिली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे हे करीत आहेत.