इंदापूर || गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. प्रामाणिक कष्ट म्हणजेच गुणवत्ता होय.गुणवत्ता ही श्रीमंतांची जहागिरी नसून परिश्रमातून गुणवत्ता तयार होत असते.दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर आपले नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षक, आई-वडील आणि संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान असते.असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये सर्वोच्च यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील हस्ते इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दि.14 ऑगस्ट रोजी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील शाहीर अमर शेख सभागृहामध्ये करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या पुढील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण संपादन करून राज्य पातळीवरील यश संपादन केले आहे. इंदापूर तालुक्यातील कल्याणी तुकाराम माने हिने दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक आणि उत्कर्ष योगेश शिंदे याने बारावीच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील गुणवत्ता सिद्ध केली आहे.
नेतृत्व हे काळानुरूप प्राप्त परिस्थितीनुसार बदलत असते व त्यानुसार ते विकसित होत असते. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले यांनी प्राप्त परिस्थितीत कुशल नेतृत्व करीत सर्वसामान्यांचा विकास केला. यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध जपण्याचे काम करीत समाजासाठी कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श सातत्याने डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी.
कु.वैष्णवी सुखदेव अनपट, कु. कल्याणी तुकाराम माने, कु. करिष्मा दशरथ भोसले, चि. सुजित रणजीत भोसले, पौर्णिमा महादेव शेगर, अभिषेक कचरे, साक्षी व्यवहारे, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, सर्व प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.