इंदापूर : आय मिरर
तुमच्या मोबाईलवर तुमचे वीज बिल थकीत आहे आणि ते तातडीने भरा नाहीतर तुमची वीज कापली जाईल आणि जर तुम्ही वीजबिल तातडीने भरले तर तुम्हाला 50 टक्के सवलत मिळेल असा जर संदेश प्राप्त झाला तर तुमच्या बँकेच्या खात्याला कात्री लागली म्हणून समजा……अशा प्राप्त संदेशापासून नागरिकांनी खबरदारी घेऊन खात्री करुनचं पुढील व्यवहार करावा अन्यथा तुमच्या सहानुभूतीचा गैरफायदा आँनलाइन गंडा घालणाऱ्या फंड्यातील टोळीने घेतला म्हणून समजा.…
इंदापूर तालुक्यात अशी अनेक उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत.याबाबत गलांडवाडी नंबर दोन येथील शेतकरी नवनाथ चांगदेव साळुंखे यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्याकडे 28 डिसेंबर रोजी दाखल केली आहे. साळुंखे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की 27 डिसेंबर रोजी त्यांच्या व्हाट्सअप नंबर वर एका अनोळखी नंबर वरून संदेश प्राप्त झाला.तुमचे वीज बिल थकले आहे ते तातडीने भरा अन्यथा तुमची वीज कापली जाईल असा तो संदेश होता.यावर साळुंखे यांनी त्या अनोळखी क्रमांकावर फोन केला त्यावेळी समोरून मी महावितरण कडून बोलत आहे तुमची वीज कापली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शेवटच्या बिलातील चारशे रुपये तात्काळ भरा व तुमच्या सर्व बिलामध्ये 50 टक्के सवलत मिळवा असं सांगण्यात आलं. त्यानंतर साळुंखे यांनी फोन पे द्वारे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सफल झाला नाही.
त्यानंतर त्या अनोळखी इसमाने तुमच्या एटीएम कार्डचा नंबर सांगा सर्व माहिती द्या अशी गळ घातली. त्यावर साळुंखे यांनी आपल्याला 50 टक्के वीज बिलाची सवलत मिळेल यावर विश्वास ठेवून आपल्या एटीएम कार्डची सर्व ती माहिती समोरच्या व्यक्तीला सांगितली आणि इथेच साळुंखे फसले. एटीएम कार्ड ची सर्व ती माहिती घेतल्यानंतर काही क्षणातच साळुंखे यांना आपल्या खात्यावरून प्रथम चारशे रुपये आणि त्यानंतर लागलीच 6677 रुपये कपात झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे साळुंखे यांचं खातं काही क्षणात रिकामं झालं.
साळुंखे यांसारखाच इंदापुरातील अनेकांना या टोळीने ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सावधगिरी बाळगून अशा पद्धतीचे ऑनलाईन व्यवहार खातरजमा करूनच करणे गरजेचे झाले आहे. आता पोलिसांनी देखील या टोळीचा तातडीने पर्दाफाश करून ऑनलाईन पद्धतीने गंडा घालणाऱ्या या टोळीला गजाआड करावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.